नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य महोत्सवांतर्गत ‘वेलींच्या गाठी’ हे मेधा मराठे लिखित आणि गोविंद जोशी दिग्दर्शित नाटक बदलत्या नातेसंबंधांचे, प्रेमाचे, विवाह संस्थेचे आणि कुटुंब व्यवस्थेचे सूक्ष्म दर्शन घडवते. शुक्रवारी (ता.७) कुसुम सभागृहात या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
नाटकाची कथा सई आणि सलमा या दोन विवाहित महिलांच्या जीवनाभोवती फिरते. सई (रुपाली वडजकर) ही आय.टी. अभियंता असून, सलमा (राजेश्वरी जोशी) प्राध्यापक आहे. कौटुंबिक जीवनातील अस्वस्थता आणि अपेक्षांची पूर्तता न होण्यामुळे त्यांचे आयुष्य गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकते. त्यांचे पती अजय (राहुल वाळवेकर) आणि अख्तर (डॉ. शिवानंद बासरे), बाबा (डॉ. राजेंद्र गोणारकर), अब्बा (गोविंद जोशी), मित्र नवीन (विवेक भोगले) या पात्रांच्या माध्यमातून नात्यांमधील प्रेम, संशय, आणि ओढ यांचा प्रवास उलगडला जातो.
नाटकात दाखवले गेलेले संवाद, पात्रांचे भावनिक आव्हान, आणि सामाजिक चौकटींमधून स्वातंत्र्य शोधण्याचा त्यांचा संघर्ष प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरतो. ‘वेलींच्या गाठी’ या नाटकाने नातेसंबंधांमधील नैतिकतेच्या सीमारेषा किती पुसट होत आहेत, यावर प्रकाश टाकत प्रेम आणि कुटुंब संस्थेतील विसंगती अधोरेखित केली आहे.हे नाटक केवळ नात्यांची कथा नसून, समाजाच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. प्रेक्षकांना प्रेम, नैतिकता, आणि व्यक्तीच्या वैयक्तिक समाधानाविषयी विचार करायला लावणारे हे नाटक ठरले.
या नाटकातील सई आणि सलमा यांच्या प्रमुख भूमिका अनुक्रमे रुपाली वडजकर आणि राजेश्वरी जोशी यांनी साकारल्या. अजयच्या भूमिकेत राहुल वाळवेकर, अख्तरच्या भूमिकेत डॉ. शिवानंद बासरे, अब्बांच्या भूमिकेत गोविंद जोशी, नवीनच्या भूमिकेत विवेक भोगले, तर बाबाच्या भूमिकेत डॉ. राजेंद्र गोणारकर झळकले. डॉ. अंकल या भूमिकेत दीपक बीडकर यांनी अभिनय केला. तांत्रिक बाजूंसाठी नेपथ्याची जबाबदारी अभिनव जोशी यांनी सांभाळली, प्रकाश योजना अशोक माढेकर यांनी केली, पार्श्वसंगीत कमलेश सारंगधर यांचे होते, रंगभूषा अर्चना जिरवनकर यांनी केली, तर वेशभूषा वैशाली गुंजकर यांनी सजवली. ‘वेलींच्या गाठी’ या नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सुरु असलेली ही मराठी राज्य नाट्य स्पर्धा स्पर्धा अप्पर मुख्य सचिव श्री.विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, सह-संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक म्हणून किरण चौधरी आणि त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.