हिमायतनगर,अनिल मादसवार। संपूर्ण महाराष्ट्रात जातीवरून राजकारण चांगलेच तापले असून, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नुकतेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे पत्र सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. तयानंतर आदिवासी समाज बांधवांनी तीव्र विरोध करत दिनांक 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर धनगर जातीला अनुसूचित जमाती (ST)मध्ये समावेश करून घेण्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग काही तास ठप्प झाला होता.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये बेकायदेशीर शासन निर्णय काढून समाविष्ट करण्यासाठी बैठका बोलावून धनगर जातीला आश्वासित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना ह्याचा अधिकार नसताना सुद्धा त्यांच्या कडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कट कारस्थान या शासनाच्या माध्यमातून होत आहे. याला मा.उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी धनगर जातीचा दावा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट न करण्याचा निर्णय फेटाळून लावलेला आहे तरीसुद्धा महाराष्ट्र शासन या विरुद्ध बेकायदेशीर बाबीचा विचार न करता दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावे म्हणून आपल्या मर्जीने अध्यादेश काढित असल्याचे दिसून येत आहे.
याच बाबीवर हिमायतनगर तालुक्यातील सकल आदिवासी समाज बांधवांकडून धनगर या जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी एक तास राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बेताल वक्तव्याचा व त्यांच्या पत्राचा जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच रखडलेल्या आदिवासी पैसा भरती तात्काळ राबावावी, आदिवासी आरक्षण (अनुसूचित जमाती ) अनूशेषाची 55687 पदे तात्काळ भरावी, 6 जुलै 2017 ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीची रिक्त झालेली 12500 पदे विषेश मोहिमेद्वारे तात्काळ भरावी, विविध मागण्याचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले आहे, यावेळी आदिवासी समाजाचे तालुका अध्यक्ष सत्यवृत्त ढोले, एकनाथ बुरकुले, रामदास वाळके, बाळू गवले, परमेश्वर ढोले सह समस्त आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होता.
खा. आष्टीकर यांच्या विधानाचा आदिवासी बांधवांकडून निषेध..
हिंगोली लोकसभेमधील दोन ते तीन लाख आदिवासी समाज बांधवांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मतदान करून लोकसभेमध्ये पाठवले आहे. ह्याचा कुठे तरी खासदारांनी विचार करून पत्रव्यवहार करावा व दोन जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात तीव्र भावना व्यक्त करून आदिवासी समाजाचे रामदास वाळके यांनी खासदारांच्या वक्तव्याचा व पत्राचा जाहीर निषेध केला.