हिमायतनगर| हिमायतनगर येथील रेल्वेगेट अंडर ब्रिज च्या (The work of Railway Gate Under Bridge) कामाला मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. सद्यस्थितीत या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड धुळ, खड्डे प्रवाश्यासाठी धोकादायक बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाश्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


भोकर ते वणी पांढरकवडा अंतर्गत राज्य रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करून केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्म मध्ये कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर केला. भोकर कडून या कामाची चांगली सुरूवात झाली. शारदा कंस्ट्रक्शन कंपनीकडून हे काम हिमायतनगर रेल्वेगेट पर्यंत वेगाने पुर्ण झाले. त्यानंतर हिमायतनगर रेल्वेगेट ते इस्लापूर,किनवट कडे जाणारा रस्ता मात्र अतिशय धिम्या गतीने पुर्ण झाला.

रेल्वेगेट हिमायतनगर भोकर कडून एक फर्लाग रस्ता तर हिमायतनगर कडून एक फर्लाग रस्ता अतिशय खराब झाला असून, या अंतर्गत रस्त्यावर गुढघ्यापर्यंत खोल खड्डे पडले असल्याने प्रवाश्यांना जीव मुठीत धरून या अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी अनेक किरकोळ अपघात घडत आहेत. भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

रेल्वेगेट जवळपास राहिलेले काम तसेच अनेक वर्षांपासून थांबून आहे. या ठिकाणी रेल्वेगेट वर ब्रिज उभारण्यात येणार असल्याचे कळते. मात्र गेल्या जवळपास दहा वर्षापासून या कामाला मुहूर्त मिळत नाही. रेल्वेगेट वर ब्रिज उभारणी हे कायम हिमायतनगरकरांना आजपर्यंत प्रतिक्षाच लागून आहे. व तसेच हिमायतनगर शहरांतून इस्लापूर किनवट जाणाऱ्या या अंतर्गत रस्त्यावर मधून डिवायडर उभारणे गरजेचे असताना तेही काम झालेले नाही.

सद्यस्थितीत ही प्रतिक्षाही कायमच असून, रेल्वेगेट वर होणाऱ्या ब्रिज साठी आणखीन किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार याकडेही प्रवाशी व तालूका वासीयांचे लक्ष लागून आहे. या भागाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या बाबींकडे तात्काळ लक्ष पुरवून संभाव्य धोका निर्माण होण्या अगोदर या रस्त्याचे उर्वरित काम व रेल्वेगेट वर ब्रिज उभारण्यात येवून, या ठिकाणी होणारी प्रवाश्यांची गैरसोय दुर करावी. अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे.