मुंबई| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए चे केंद्रात सरकार स्थापन होत असून उद्या रविवार दि.9 जून रोजी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक साधणार आहेत. एन डी ए सरकार चे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाची उद्या शपथ घेणार असून त्यांच्या समवेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) चे घटक दलाच्या ही निवडक नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे.


एन डी ए चे घटक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांचा सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाला असून उद्या दि .9 जून रोजी ना.रामदास आठवले केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेऊन केंद्रीयमंत्री म्हणून हॅटट्रिक करणार आहेत.त्यामुळे देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत.यात मुंबईतील महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते आघाडीवर असून अनेक लोक दिल्लीत दाखल झाले असून उद्या रविवारी सुद्धा मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्ते दिल्लीला पोहोचत आहेत.


रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी 5 जुलै 2016 रोजी केंद्रीय प्रथमतः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.तेंव्हा देशभरात दलित बहुजन जनतेत आनंद उत्सव साजरा झाला होता.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा नेता पहिला भीमसैनिक म्हणून ना. रामदास आठवले यांना केंद्रीय राज्य मंत्री पदाचा बहुमान लाभला होता.त्यानंतर 2019 मध्ये केंद्रीयमंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा रामदास आठवले यांना संधी मिळाली होती.आता उद्या होणाऱ्या मोदी सरकार च्या तिसऱ्या टर्म मध्ये ना. रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्री मंडळात तिसऱ्यांदा समावेश होणार आहे.

मात्र केंद्रीय मंत्री मंडळात ना. रामदास आठवले यांना पुन्हा केंद्रीय राज्य मंत्री पद मिळणार का? की स्वतंत्र प्रभार चे मंत्रिपद मिळणार की केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून ना. रामदास आठवले यांना बहुमान मिळणार याकडे आंबेडकरी जनतेचे लक्ष लागले आहे.देशभरातील दलित बहुजन रिपब्लिकन जनतेत रामदास आठवले यांच्या मंत्री पदाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रामदास आठवले यांना यंदा केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद मिळावे अशी देशभरातील कोट्यावधी दलित बहजन रिपब्लिकन जनतेची इच्छा आहे. देशभरातील आंबेडकरी जनतेने ना. रामदास आठवले यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री व्हावेत म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
