हिमायतनगर,अनिल मादसवार। दासरी, मालादासरी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना मालादासरी कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे, समाजाकडे असलेल्या कास्ट सर्टिफिकेटची वैधता होणे गरजेचे असून, दासरी, मालादासरी समाज एकच असून, नव्याने घटनेमध्ये झालेल्या दुरुस्तीत दासरी ऐवजी दासरे असं चुकुन झाले आहे, त्यात दुरुस्ती करून पूर्ववत दासरी असा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी दासरी मालादासरी समाज संघटनेचे अध्यक्ष मुरहारी दमन्ना यंगलवार यांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करून दासरी, मालादासरी समाजास योग्य न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे.
नुकतेच हिमायतनगर येथे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर आले होते, यावेळी त्यांची भेट दासरी माला दासरी समाजाचे अध्यक्ष मुरहारी यंगलवार यांनी घेऊन वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. आमदार महोदयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आम्ही दासरी व मालादासरी एकच असुन, दोन्ही समाजाचा धर्म एक कुलदैवत एक, धंदा पण एकच असून, हळद, कुंकु, दातन, करदोडे विकणे हा मुळ व्यवसाय असून, दोन्ही समाजाचे संबंध जवळचे असल्याने रोटी-बेटी व्यवहार सुरळीत चालतो आहे.
आमचा समाज महाराष्ट्र अत्यल्प (2500 ते 3000) एवढा अल्पसंख्याक असून, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ या चार जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर पासुन राहतो आहे. समाजाच्या अडचणी व न्याय हक्कासाठी आम्ही दहा वर्षा पासुन शासन दरबारी निवेदन देऊन देखील एकही विधानसभा सदस्याने विधानसभेत आमच्या समाजाचा प्रश्न मांडला नाही तसेच नव्याने दुरुस्ती झालेल्या गैजेटमध्ये झालेल्या चुकीची दुरुस्ती केली गेली नाही.
त्यामुळे आमच्या दासरी, मालादासरी समाजाचे विद्यार्थी व नागरीकांना मालादासरी व दासरी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र जाणीव पुर्वक देण्यांत येत नाहीत त्यामुळे सामाजिक स्थिती अधिक खालावलेली आहे. आमचा समाज महाराष्ट्रात अत्यल्प असुन देखील कोणालाही शासकीय सवलत अद्याप मिळाली नाही. पूर्वीचा आमचा जातीवंत व्यवसाय या काळाच्या ओघात बंद पडले असून, दुसरा व्यवसाय करणेसाठी कोणकडेही भांडवल उपलब्ध नाही. या समाजाला कोणतीही शासकीय सवलत जात प्रमाणपत्राच्या अभावी मिळत नाही.
शासनाच्या गॅजेटमध्ये 40 नंबरला मालादासरी हि जात आहे तरी पण जातीचे प्रमाणपत्र काहिंना मिळाले तर अजूनही तहसील द्वारे मिळण्यास अडचणी येत आहेत. शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन देखील जातीच्या प्रमाणपत्राची वैधताही होत नाही. कारण समाजाकडे इ.स. 1950 च्या पुर्वीचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. हा समाज उदर निर्वाहसाठी खेडोपाडी, वाडी तांड्यावर भटकती करीत होता. पालकांच्या आज्ञानामुळे त्यांनी आपल्या पाल्याच्या टि. सी. वर दासरी, मालादासरी, होलादासरी, अय्यावार अशा जातीचा उल्लेख केल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.
तरी आपण याकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या टि. सी. वर चुकून पडलेली जात जसे दासरी, मालादासरी , होलादासरी ह्या सर्व जाती वेगळ्या नसुन एकच आहेत हे गृहित धरुन फक्त मालादासरी मुख्य जात समजून सर्वांना मालादासरी प्रमाणपत्र विना अट देण्यांत यावे व जात प्रमाणपत्राची वैधता व्हावी. दासरी, मालादासरी समाजास मालादासरी या एकाच प्रवर्गामध्ये समाविष्ट करुन सर्वांनी योजनेचा लाभ देण्यंत यावा. गॅजेट मध्ये दासरी ऐवजी दासरे झालेले आहे. त्या गॅजेटमध्ये दासरे ऐवजी पूर्वीच्या गैजेटप्रमाणे दासरी, मालादासरी हेच नाव दुरुसत करुन टाकावे असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति समाज कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई, आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब, हदगांव – हिमायतनगर विधान सभा मतदार संघ सर्व पत्रकार बांधव, नांदेड यांना देण्यात आले आहे.