नांदेड| जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले प्राचीन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर येथील श्री विमलेश्वराच्या यात्रेला दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी प्रारंभ होतो व ही यात्रा तीन दिवस चालते. यावर्षी दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी शनिवारी सकाळी गावकऱ्यांच्या सामूहिक महादेवाच्या अभिषेकाने यात्रेला प्रारंभ होतो मराठवाड्यातून तीन दिवसात श्री महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तगण येत असतात.


पौर्णिमेच्या दिवशी रात्री मरळक गावाच्या परिसरातील अनेक गावातून महादेवाच्या काठ्या कावळ्या दर्शनासाठी भक्तगण घेऊन येत असतात. शनिवारी रात्री दहा वाजता मरळक येथील सर्व महिलांच्या वतीने महादेवाला ओवाळण्यासाठी सामूहिक आरत्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रात्री बारा वाजता महादेवाची पालखी मिरवणूक यात्रेतून वाजत गाजत निघत असते.


पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी रविवारी दुपारी तीन वाजता कुस्त्यांची दंगल असते. मरळक येथील यात्रेतील कुस्त्यांचा फड संपूर्ण मराठवाड्यामध्ये नावाजलेला असल्यामुळे अनेक नामवंत पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी या गावांमध्ये येत असतात. विजेत्या पैलवानांना यात्रा कमिटीच्या वतीने योग्य ते बक्षीस देऊन मान सन्मान दिला जातो.

दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी रात्री मंदिरापासून महादेवाची मूर्ती पालखीत बसवून भजनी मंडळ नामघोषाच्या जल्लोषात वाजत गाजत पालखी मिरवणूक मरळक बुद्रुक गावाकडे काढली जाते. पहाटे गावातून मुख्य रस्त्याने मिरवणूक काढून दुसरे दिवशी सकाळी नऊ वाजता गावातील मारुती मंदिरासमोर आरती होऊन पालखीची सांगता केली जाते.

यात्रेत बेल फुल, टिपरे बताशे, जिलेबी चिवडा ,जनरल स्टोअर्स, भांड्यांचे दुकाने , बांगड्यांची दुकाने , लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने ,आकाश पाळणे, मनोरंजनाचे कार्यक्रम तीन दिवस मोठ्या प्रमाणामध्ये चालतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व भाविक भक्तांनी यात्रेत सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी. अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने व श्री महादेव मंदिराचे पुजारी श्री मन्मथ स्वामी यांच्या वतीने करण्यात येते.