लोहा/नांदेड। जिल्ह्यातील लोहा येथे श्रीमती आर. जी. वैराळे मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा घोळ (Scam of crores) झाल्याची तक्रार 8 पिग्मी एजंटांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांच्याकडे दिली आहे.


लोहा येथे श्रीमती आर. जी. वैराळे मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी कार्यरत होती. त्यात पिग्मी एजंट या पदावर सचिन भानुदास मुडसे, मंगेश मारोती वंजारे, शेख सिकदर शेख बाबु, हनमंत मनोहर कागणे, गोविंद हरीभाऊ पवार,अनिल किशनराव वट्टमवार हे कार्यरत होते. सोसायटीने त्यांना दाखवलेल्या कमिशनच्या लोभात अडकून त्यांनी अनेक सदस्य बनवले. पण त्यांना मिळणारा कमिशनचा भाग आणि गुंतवणुकदारांना मिळण्याचा हक्क मिळत नव्हता. तेंव्हा सध्याचे या सोसायटीचे अध्यक्ष अमोल बाजीराव ढगे, सचिव गजानन उत्तमराव शिंदे, उपाध्यक्ष मनोजकुमार श्रावण दिवेकर, लोहा शाखाचे अध्यक्ष सुनिल भानुदास मैड, सदस्य गौतम गुणाजीराव वैराळे, आत्माराम रामजी मानुरकर, त्र्यंबक हनमंतराव पाटील, दत्ताहरी बाबाराव कदम, हिरामण दशरथ घोरबंद, ऐश्वर्या अमोल ढगे, लताबाई बालाजी ढगे आणि विनोदकुमार बद्रीनारायण धुत यांच्याकडे अनेक वेळा आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार केली आणि न्याय मागितला.

पण त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही म्हणून या सर्व 8 जणांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांच्याकडे वेगवेगळे अर्ज देवून असे म्हटले आहे की, तुमच्या कमिशनपेक्षा 2 टक्के जास्त कमीशन देवू तसेच खातेदारांना अर्थात गुंतवणूकदारांना 12 टक्केऐवजी 15 ते 18 टक्के परतावा देवू परंतू असे काही घडले नाही आणि आमची फसवणूक झाली आहे. आपल्या अर्जात अर्जदारांनी 2017 ते 2022 आणि सन 2013 ते 2017 या कालखंडात कोणते कार्यकारी मंडळ सोसायटीत कार्यरत होते. यांची यादी पण सादर केलेली आहे.

या अर्जाचा तपास करण्यासाठी हा अर्ज लोहा पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती यावेळी अर्जदारांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. या निवेदनावर सचिन मुदसे, मंगेश वंजारे, सिकंदर शेख, हणमंत कागणे, गोविंद पवार, अनिल वट्टमवार, दीपाली कोंढकार, शीतल कऱ्हाळे, या अल्प बचत संकलन करणाऱ्या एजंटच्या स्वाक्षऱ्या आहेत.
