नवीन नांदेड| जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्यांना उच्च व चांगल्या दर्जाच्या सुविधा तथा शिक्षण मिळावे, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा, शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकसहभाग, कारपोरेट कंपन्यांचे सामुदायिक सामाजिक निधी अर्थात सि.एस.आर. फंड सहभागातून गगनभरारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी राबविला आहे.
याच उपक्रमातून प्रेरित होवून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी त्यांचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ ओमप्रकाश दरक यांना मागणी केली असता त्यांनी हैद्राबाद येथील सिग्नोड कंपनीतील अभियंता निखिल सोनी यांच्यावतीने कंपनीच्या सि.एस.आर.फंडातून एक लक्ष साठ हजार रुपयांचा शुध्द पेयजल प्रकल्प नुकताच विद्यार्थ्यांना समर्पित केला. या प्रकल्पाद्वारे दिड हजार विद्यार्थी दररोज शुध्द पाणी पिण्यासाठी उपयोगात आणत आहेत. हा प्रकल्प विद्यार्थ्यांना खुला करण्यासाठी अभियंता निखिल सोनी, सी.ए.अंकिता भुतडा, डॉ दरक, ममता दरक हे विष्णुपूरी शाळेत उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
यासमयी मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, उदय हंबर्डे, शिवाजी वेदपाठक, कृष्णा बिरादार, एम.ए.खदीर, दिनेश अमिलकंठवार, नागोराव एलके व सर्व शिक्षकांनी सिग्नोड कंपनीचे सोनी यांचा सत्कार केला. कंपनीचे आभार विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे, उपसरपंच अर्चना हंबर्डे, माजी जि.प.सदस्य साहेबराव हंबर्डे आणि काळेश्वर संस्थानचे सचिव शंकरराव हंबर्डे यांनी व्यक्त केले.