नांदेड| कापुस आणि सोयाबिन पिकासाठी सन २०२३ च्या खरीप हंगामातील मिळणारे पीक विमा अनुदान नांदेड दक्षिण मतदार संघातील वंचित लाभार्थी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आ. हंबर्डे यांनी या निवेदनात नमूद केले आहे की राज्य शासनाकडून सन २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबिन आणि कापुस पिक घेणा-या शेतक-यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्यात येत आहे. यासाठी कृषी सहाय्यकांमार्फत संबंधित पिकांचा पिक पेरा असलेल्या शेतक- यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु माझ्या मतदार संघातील अनेक गावांमध्ये ज्या शेतक- यांनी मागील सन २०२३ च्या खरीप हंगामातील पीक सोयाबिन व कापुस हे पिक घेतले होते.
काही तांत्रिक अडचणीमुळे शेतक-यांना ई-पिक पाहाणी करण्यात व्यत्यय आला असल्यामुळे त्यांची लाभार्थी यादीमध्ये नावे आली नाहीत. विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे पिकांचा विमा भरलेला आहे, त्यांच्या सातबारावर सुध्दा कापुस आणि सोयाबिन हा पेरा आहे. असे अनेक लाभार्थी शेतकरी २०२३ च्या खरीप हंगामातील लाभार्थी यादीमध्ये नाव नसल्याने सदरील लाभापासून वंचित राहत आहेत. तरी सर्व लाभार्थी शेतक-यांना लाभ मिळवुन देण्यासाठी शासकीय स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. आमदार मोहनराव हंबर्डे यांनी या निवेदनात केली आहे.