नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाने आज ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या तीन दशकामध्ये या संकुलाने अनेक विद्यार्थी घडविले. दरवर्षी या संकुलातील १५ ते २० विद्यार्थी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण होतात. यावर्षीही १२ विद्यार्थ्यांनी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
संकुलामधील बरेच विद्यार्थी बाहेर देशात चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहेत. शिवाय या संकुलामध्ये खगोलशास्त्राशी संबंधित संशोधनासाठी उच्च प्रतीची दुर्बीण, टाईम डोमेन रोफलिटोमीटर, नॅनो मटेरियल प्रयोगशाळा इत्यादीसह अनेक उच्च प्रतीची उपकरणे उपलब्ध आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळते. त्यामुळे गेल्या तीन दशकातील या संकुलाची वाटचाल ही विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते आज दि. ८ ऑगस्ट रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठता डॉ. एम. के. पाटील, संकुलाचे संचालक डॉ. ए.सी. कुंभारखाने, प्रो. डॉ. आर. एस. माने यांची उपस्थिती होती.
पुढे कुलगुरू डॉ. चासकर म्हणाले की, या संकुलामधील अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन हे जागतिक स्तरावर कौतुकास्पद असून त्यांचे अनेक शोधनिबंध अंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रकाशित होत आहेत. इतर कोणत्याही विद्यापीठाच्या तुलनेत या भागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग हा निश्चितच कष्टाळू आहे. येथील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी खूप वाव आहे. आपल्या संशोधनाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचला तर त्या संशोधनाला एक खरे महत्व आहे. संशोधनामुळे तुमचा विकास झाला म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असा नसून तुमच्या संशोधनामुळे किती जणांचा विकास झाला हे खरे यशस्वीतेचे सूत्र आहे. असा कानमंत्र ही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
सर्वप्रथम प.पू. स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून संकुलाच्या ‘फिजिक्स क्लब’ चे उद्धघाटन केले. त्यानंतर संचालकांनी गेली २९ वर्षाच्या संकुलाची प्रगती थोडक्यात विषद केली. याप्रसंगी संकुलाचे संचालक डॉ. एम. के. पांडे, प्रो. अनंत चौधरी. प्रो. जयंत साळी, प्रो. अजय चौधरी यांनीही दूरदृशप्रणालीद्वारे संकुलाचे आभार म्हाणुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संकुलाच्या माजी संचालिका डॉ. मेघा महाबोले, डॉ. अरविंद सरोदे, डॉ. काशिनाथ बोगले यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकीशा जकाते यांनी तर आभार प्रदर्शन कु. मिसबाह सिद्दिकी यांनी केले.