नांदेड l श्री यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी या संस्थेतर्फे दरवर्षी लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे विसावे वर्षे आहे. सातत्यपूर्वक प्रथितयश व नवोदित साहित्यिकांचा मेळा भरविण्याचे वाङ्मयीन कार्य संयोजक दिगंबर कदम करीत आहेत.
यंदाच्या 20 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद मोरे हे करणार असल्याची माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.
हे संमेलन एक दिवसीय असून ग्रंथ दिंडी व शोभायात्रा, ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन, ग्रंथ प्रकाशन, पुरस्कार वितरण, प्रगट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन व समाज प्रबोधनपर कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे.
संमेलन अध्यक्षपदी कवी व कादंबरीकार प्रा. महेश मोरे यांची नुकतीच निवड झाली आहे. हे संमेलन जानेवारी 2025 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आतापावेतो मागील संमेलनाचे उद्घाटन कै. ग.पि. मनूरकर, प्रा.डॉ. जगदीश कदम, प्रा. भास्कर चंदनशिव, प्रा. भु.द. वाडीकर, अभिनेते अनिल मोरे, आ.कै. वसंतराव चव्हाण, प्राचार्य रा.रं. बोराडे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, बाबू बिरादार, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, प्रा. शेषराव मोरे, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, प्रा. भ.मा. परसावळे, डॉ. वृषाली किन्हाळकर, डॉ. गोविंद नांदेडे, पुरूषोत्तम सदाफुले, राजेश देशमुख कुंटूरकर, प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस, माधवराव पा. शेळगावकर यांनी केले आहे. संयोजन समितीतर्फे प्रा.डॉ. सदानंद मोरे यांना रितसर पुणे येथे निमंत्रण देण्यात आले व त्यांनी ते स्वीकारले आहे.