किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट/माहूर मतदारसंघातून येत्या विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दिल्यास निश्चित विजय होईल. अशी मागणी ओबीसी विभागाचे प्रदेशउपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवीन राठोड यांनी केली.
या मतदारसंघात स्व.उत्तमरावजी राठोड, आ.किशनरावजी पाचपुते यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केले. या दोघांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या शोधात असतानाच आ. प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादीसाठी ही जागा हायजॅक करुन तीन टर्म आमदार पद भोगले. किनवट विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मांडवीच्या राठोड घराण्याचा वारसा म्हणून उच्चशिक्षित, शिक्षण सम्राट राजकीय पाठबळ असलेले मांडवी भूषण नवीन राठोड यांच्या नावाची चर्चा किनवट माहूर दोन्ही तालुक्यात सुरू आहे.
किनवट मतदार संघ हा बंजारा बहुल आहे. महा विकास आघाडीतर्फे हा मतदार संघ जर नवीन राठोडच्या रूपात काँग्रेसला सुटल्यास ही जागा पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जाईल आणि भाजपाला पराभूत करेल या भूमिकेतून नूकतेच नांदेड येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी यांना निवेदन देऊन उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी किनवटचे प्रभारी के. मूर्ती, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्यमवार व माहूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, किनवट शहराध्यक्ष गिरीश नेमन्नीवार, ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण दराडे, सुभाष बाभुळकर, ओबिसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत राठोड, ईश्वर चव्हाण, कुंदन पवार, जयवंत कांबळे, रमेश राऊलवार, सीराज जिवाणी, उत्तम राठोड व तालुक्यातील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.