नांदेड| जन आरोग्य अभियान, नांदेडच्यावतीने आज दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी विसावा हॉटेल येथील कार्यक्रमात ‘नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेचे रिपोर्ट कार्ड व जाहीरनामा’ प्रकाशित केला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष जन स्वास्थ अभियानाचे सह संयोजक डॉ. अभय शुक्ला हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व नांदेड येथील आरोग्यवस्थेचा आढावा डॉ. राजेश माने सर्वांसमोर सादर केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गावंडे, डॉ. अशोक बेलखोडे, दीपक जाधव, परमेश्वर पौळ, दत्ता तूमवाड, के.के.जामकर, उपस्थित होते.
जन आरोग्य अभियानाने तयार केले – नांदेडच्या आरोग्य सेवांवर रिपोर्ट कार्ड डॉ. अभय शुक्ला आणि दीपक जाधव यांनी यावेळी रिपोर्ट कार्ड सादर केले. नांदेड वैद्यकीय महाविद्यालय घटनेच्या एक वर्षानंतर आवश्यक सुधारणा नाही, आरोग्य व्यवस्थेला 100 पैकी केवळ 24 मार्क नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे ऑक्टोबर 2023 मध्ये 24 तासात 24 मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामध्ये नवजात बाळांची संख्या 11 इतकी होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटून आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर टीकेची झोड उठली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी इथल्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची अनेक आश्वासने दिली होती. मात्र या घटनेला एक वर्ष उलटून गेल्यानंतर, प्रत्यक्षात फार बदल झाल्याचे दिसून येत नाही. जन आरोग्य अभियानाच्यावतीने एकूण 10 निकषांच्या आधारे नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेत झालेल्या बदलांचे मूल्यांकन करण्यात आले, त्यामध्ये 100 पैकी केवळ 24 गुण इथल्या आरोग्य व्यवस्थेला मिळू शकले आहेत.
नांदेड शहर व जिल्ह्यासाठी नांदेड हेल्थ ॲक्शन प्लॅन तयार करण्यात यावा. यामध्ये स्थानिक डॉक्टर, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, सामजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असावा. हेल्थ ॲक्शन प्लॅन मध्ये खालील मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजनांचा समावेश असावा. लोकाधारित देखरेख प्रक्रिया राबविण्यात यावी, नांदेडच्या सिव्हील हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बजेटमध्ये वाढ करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या उमेदवारांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्या मध्ये आरोग्याचा प्रश्न किती जणांनी घेतलाय हा देखील प्रश्न जन आरोग्य अभियान तर्फे यावेळी करण्यात आला आहे. यावेळी प्रा. डॉ. हनुमान भोपाळे, प्रा. प्रभाकर जाधव,माधव आटकोर, प्रा. एस.एस.जाधव, डॉ. बालाजी कॉम्पलवार, प्रा. डी.एन.मोरे, रशीद पेटेल, आनंदा बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.