मुंबई | जीएस महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. अॅड. उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणाऱ्या उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळ अनावरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती महानगर व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी दिली आहे.
याविषयी माहिती देताना शेळके म्हणाल्या की स्व. गुलाबराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एस. महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून काम करताना सहकार व सामाजिक क्षेत्रात स्व. अॅड. उदय शेळके यांचा नेहमीच पुढाकार होता. तो सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सुरुवात करणार आहोत. या फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण, युवकांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन, सरकारी बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, खासदार निलेश लंके, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते अरुण कडू पाटील, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, अशोक धात्रक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जी. एस. महानगर बॅंकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके व संचालिका गीतांजलीताई शेळके यांनी केले आहे.