हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाच्या पेरणीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही घरांची पडझड झाली तर अनेकांच्या घरात चक्क पाणी शिरले. नैसर्गिक संकटाला आपण कोणीही रोखू शकत नाही. परंतु प्रशासनाने जर सुयोग्य नियोजन केलं तर नागरिकांची होणारी गैरसोय व तसेच हेळसांड मात्र रोखता येणं शक्य आहे. हिमायतनगर नगरपंचायत याबाबतीत मात्र अपयशी ठरली असून, शहरातील अनेक घरांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाचे नाल्यातील दुर्गंधियुक्त ड्रेनेजचे पाणी घरात शिरून ग्रुपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसानंतरही पाणी ओसरायचे काही नाव घेत नाही. यामुळे नागरी वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आणि अनेक जण आजारी पडताना दिसून येत आहेत.
महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखाताई चव्हाण या मतदार संघात दौरा करत आहेत. हा दौरा करत असताना त्यांनी अनेक दुर्लक्षित प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत न्याय मिळवून देण्यासाठी झटताना दिसून येत आहेत. शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीला याबाबत वारंवार सांगूनही लक्ष दिले जात नसल्याने वॉर्ड क्रमांक १६ नागरिकांनी हि समस्या डॉ. रेखाताई चव्हाण याना सांगून शहरातील दुर्लक्षित भागात येण्याची विनंती केली होती.
त्यांनी भेट दिल्यानंतर या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षित कारभाराचा पाढा वाचला. एव्हढंच नाहीतर प्रशासकीय यंत्रनेच्या सुस्त कारभारामुळे मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्यांची अवस्था किडय मुंग्या सारखी झाली असल्याचे या भागातील दुर्गंधीयुक्त वातावरण आणि घाण रस्त्यावर आल्याचा स्थितीवरून दिसून आले आहे. विशेषतः शहरातील वॉर्ड क्रमांक १६ मधील कुटुंबियांना मूलभूत गरजा ही मिळणे दुरापास्त झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्ते नाल्या बनवून घरे भरण्याचे कामे केली जातात मात्र नागरिकांच्या आवश्यक महत्वाच्या गरजा आणि विकास कामे या बाबीकडे चक्क दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितल्यावरून जनतेमध्ये प्रचंड रोष आणि चीड निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे.
डॉ. रेखाताई चव्हाण यांनी भेट दिल्यानंतर परिसरातील बहुतांश नागरिकांनी आपण राहणाऱ्या घराची अवस्था पुराच्या पावसामुळे आणि नाल्याच्या दुर्गंधीमुळे कशी झाली. घरात पाणी शिरल्यावर गृहउपयोगी साहित्याचे नुकसान होऊन रात्र जागून काढावी लागली. या परिस्थितीने घरातील सदस्य विविध आजाराला बळी पडत आहेत याची जाणीव करून दिली. नागरिकांसोबत घराघरात जाऊन पाहणी करून, तेथील जनतेशी संवाद करत स्थानिक प्रश्न जाणून घेऊन या संदर्भात आणि शहरातील इतर सखल भागातील नागरिकांना मूळ नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं कि, लोकांनी बोलावल्यामुळे मी वार्ड क्रमांक 16 मधील वस्तीत भेट दिली येथील दयनीय अवस्था पाहून थक्क झाले. नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या मिलीभगत कारभारामुळे वस्तीतील घराघरांत पाणी शिरलं. अतिवृष्टी होऊन आठ दिवस लोटले तरी दुर्गंधियुक्त पाण्यामुळे घरातील ओलं अजूनही कायम आहे. अस्वच्छ नाल्या व परिसर यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश नागरिकांच्या घराची अवस्था स्वतः जाऊन पहिली आहे. ज्यांचं नुकसान झालं त्यानं मदत मिळणं आवश्यक असून, या अतिवृष्टीच्या फटक्याने शहरात साथीचे आजार पसरण्यापूर्वी नगरपंचायतीने तात्काळ उपाय योजना करणे आवश्यक आहे. परिसरात धूर फवारणी करून आणि नाल्याची तात्काळ स्वच्छता करून परिसरात पावसाचे पाणी पुन्हा शिरणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करायला हवे. तरच नागरिकांना सुरक्षित आरोग्याची हमी मिळू शकेल अश्या सुचना प्रशासनास केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील अर्धवट नळयोजनेच्या कामामुळे भर पावसाळ्यात अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. याची देखील माहिती घेतली असून, या सर्व समस्या थेट जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. रेखाताई चव्हाण यांनी सांगितले.