उमरखेड,अरविंद ओझलवार। तालुक्यातील मार्लेगाव येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या थाटात तुतारीच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करत सौ कौशल्या भाऊराव कदम या दाम्पत्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले .या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी संपूर्ण गाव अनावरण सोहळ्यासाठी उलटले होते .


आज दि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्लेगाव वाशीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पहाटे पाच वाजता दीपोत्सव साजरा केला यावेळी संपूर्ण पुतळा परिसर उजळला होता .पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी परिसर रांगोळ्याने सजवण्यात आला होता . सदर अनावरण पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी स्वेच्छेने दहा लाख रुपये देणाऱ्या भाऊराव कदम व सौ कौशल्याबाई कदम या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले .


यावेळी ढोल ताशाच्या गजराने तसेच रंगाची व फुलांची उधळण व छत्रपती शिवरायांच्या घोषणाने आसमंत दणाणून गेला होता . यावेळी माजी आमदार राजेंद्र नजरधने, प्राचार्य मोहनराव मोरे, चितांगराव कदम, कृष्णा पाटील आष्टीकर, राजेश खामनेकर ,ऍड बळीराम मुटकुळे, सतिष नाईक तसेच नितीन शिंदे यांच्या आवाजाने शिवगर्जना करण्यात आली व मराठा योद्धा अंदोलनकर्ते सचिन घाडगे यांचा शिवप्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय मंडळी सामाजिक मंडळी उपस्थित होती .

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावकऱ्यांनी सौ कौशल्याबाई भाऊराव कदम व सौ सरिता अवधूत कदम या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. गावामध्ये छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत अनवाणी राहील अशी प्रतिज्ञा घेऊन दहा वर्ष अनवाणी राहणाऱ्या अवधूत कदम यांची प्रतिज्ञा पूर्ण झाल्याबद्दल चितांगराव कदम सरांनी त्यांच्या पायात पादत्राणे घालून प्रतिज्ञा सोडावयास लावली .

पुतळा अनावरणानंतर शिवव्याख्याते गजानन दिवशीकर यांचे छत्रपती शिवरायावरील कीर्तन संपन्न झाले त्यानंतर महाप्रसाद होऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली . सदर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कदम ,गुणवंत सूर्यवंशी ,शिवाजी शिंदे यांनी केले . छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण गाव सजवण्यात आले होते पुतळ्याचा परिसर आर्किटेक्चर नेहा गणपत कापसे पुणे यांनी मोफत डिझाईन केले .संपूर्ण सोहळ्याला दैदिप्यमान करण्यासाठी शिवप्रतिष्ठान समिती मारलेगाव व समस्त गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले .