देवाचा प्रसाद ग्रहण करत असताना अगदी भक्तीभावाने घेतला जातो. तसेच डोळे बंद करून विश्वासाने गोळ्या औषधी ही खाण्यात येतात. देवाच्या प्रसादावर जेवढा विश्वास ठेवण्यात येतो , तेवढाच विश्वास डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांवर ठेवल्या जातो. परंतु जर गोळ्या – औषधीच बनावट असतील तर किंवा त्यामुळेच जीवाला धोका आहे, असे समजल्यावर त्या माणसांची काय अवस्था होईल ? याचा नुसता विचार जरी केला तरी जिवाचा थरकाप उडतो. मराठवाड्यातील बीड, नांदेड, धाराशिव व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आले आहे.
मराठवाड्यातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधी व गोळ्यांचा पुरवठा करून रुग्णांसाठी त्याचा वापरही झाल्याचे उघडकीस आले आहे. नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून मे २०२३ मध्ये न्यूक्लास ६२५ या गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या गोळ्यांचा अहवाल ऑक्टोबर २०२४ मध्ये प्राप्त झाला .त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने १ लाख २३ हजार गोळ्यांचा साठा जप्त केला . दीड महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटूनही संबंधित कंपनीविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विशेष म्हणजे ज्या कंपनीने हा पुरवठा केला होता ती कंपनीच मुळात अस्तित्वात नाही , असे सुरुवातीच्या तपासात आढळून आल्याचे सांगितले जात आहे . त्यामुळे पुरवठादार व जिल्हा शासकीय रुग्णालयाची यामध्ये मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे. धाराशिव जिल्ह्यातही औषध निर्मात्या कंपन्यांकडून आवश्यक गुणवत्ता नसणाऱ्या सहा प्रकारच्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तीन टप्प्यात जवळपास पावणेतीन लाख गोळ्या त्या कंपनीने परत बोलावून घेतल्या.
औषध पुरवठा करणाऱ्या त्या एजन्सीला धाराशिव मध्ये काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यात आलेल्या सिप्रो-२५० एमजीच्या १ लाख ९ हजार २४०, सेफिक्सिम १ लाख १ हजार ३६२, सिप्रोफ्लोक्सासिन-५०० च्या ४० हजार २५८, एजिथ्रोमाइसिन १० हजार ८६४, अमॉक्सिसिलिन-३७५ च्या १९ हजार ६३०, अमॉक्सिसिलिन-६२५ च्या ७ हजार २४० अशा एकूण २ लाख ८८ हजारांहून अधिक गोळ्यांमध्ये आवश्यक गुणवत्ता नसल्याने संबंधित कंपनीला परत केल्या आहेत. यापैकी काही गोळ्या संबंधित कंपन्यांनी बदलून दिल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही २३ प्रकारच्या औषधी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या ३३ प्रकारच्या औषधींचा वापर थांबविण्यात आला .शिवाय यातील २६ प्रकारची औषधी संपलेली असल्याने ज्या औषधींचा वापर थांबविला आहे. त्याऐवजी पर्यायी औषधी रुग्णांना दिली जात असल्याचे घाटी येथील अधिष्ठाता यांनी सांगितले. मराठवाड्यातील बीड जिल्हा तसा नेहमीच चर्चेत असतो. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा करणारी एक टोळी उघडकीस आली आहे. मराठवाड्यात सर्वप्रथम या ठिकाणी बनावट गोळ्यांच्या पुरवठा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात असलेल्या टोळ्याच समोर आल्या आहेत.
अंबाजोगाई येथील रुग्णालयात अॅझिमॅसीन – ५०० या औषधांचे सॅम्पल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते . त्यांची तपासणी होऊन २३ ऑक्टोबर २०२४ रोजी आलेल्या अहवालात सदरील औषध हे रुग्णांसाठी निष्क्रिय व बनावट असल्याचे उघडकीस आले. या गोळ्यांमध्ये अॅजिथ्रोमायसीन हा घटक असणे अत्यंत आवश्यक होते. परंतु सदरील गोळ्यांमध्ये अॅजिथ्रोमायसीन नसल्यामुळे हा बनावट गोळ्यांचा प्रकार उघडकीस आला. किमान साडेआठ हजार रुग्णांच्या पोटात या गोळ्या गेल्या . यामधून जीवित हानी झाली नाही, असे सांगितले जात असले तरी या प्रकरणाच्या खोलाशी गेल्यास यामधून काहीतरी वेगळेच बाहेर येईल, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. याप्रकरणी सुरेश दत्तात्रय पाटील, मिहीर त्रिवेदी ( रा . भिवंडी जि. ठाणे ) , द्विती सुमित त्रिवेदी, ( सुरत ) व विजय शैलेंद्र चौधरी रा. मीरा रोड , ठाणे या चौघा जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या औषधीच्या तक्रारीनंतर सव्वा वर्षाने अहवाल प्राप्त झाला व त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजेच या दरम्यान हजारो रुग्णांच्या पोटात त्या गोळ्या गेल्या. त्या बनावट गोळ्या रुग्णांसाठी किती घातक ठरल्या हे आता शोधण्याची गरज आहे.
मराठवाड्यात ज्या औषधी कंपनीने गोळ्या पुरवठा केल्यात त्यापैकी उत्तराखंडमधील ब्रिस्टल फार्मा , केरळमधील रिफंड फार्मा, बायोटेक फॉर्म्युलेशन व मेलबर्न बायो सायन्स तसेच एस एम एन लॅब या पाच कंपन्या बनावट असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांनी प्रत्येक ठिकाणी बनावट औषधांचा पुरवठा केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे . त्यामुळे या कंपन्यांची औषधे असल्यास त्याबाबत त्वरित कळविण्यात यावे, असे पत्र संचालक कार्यालयातर्फे मराठवाड्यातील जिल्हा रुग्णालयांना पाठविण्यात आले आहेत.
पूर्वी एक म्हण खूप प्रसिद्ध होती. शहाण्या माणसाने कोर्टाची व पोलीस स्थानकाची पायरी चढू नये, असे म्हटले जायचे . परंतु आता त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. शहाण्याला कधीही दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये , असेच मराठवाड्यातील अनेक प्रकरणांवरून म्हणता येईल. आरोग्य यंत्रणेतील पुरवठादार तसेच ठेकेदार यंत्रणा रुग्णांच्या जीवावर उठली आहे. बनावट औषधांचा पुरवठा करून या लोकांनी काय साध्य केले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अन्न व औषधी प्रशासनाचा कारभारही रुग्णांसाठी जीवघेणाच ठरत आहे. तपासणीसाठी पाठविलेल्या गोळ्यांबाबतचा अहवाल सव्वा वर्षाने प्राप्त झाला . आणि त्यानंतर गुन्ह्याची नोंद होते, म्हणजे आरोग्य यंत्रणा तसेच अन्न व औषध प्रशासन हे दोघेही चक्क झोपेत आहेत की काय ? असेच म्हणण्याची वेळ अंबाजोगाई येथील बनावट गोळ्या प्रकरणानंतर सर्वांच्या लक्षात येत आहे.मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधी गोळ्यांचा वेगळाच काळाबाजार चालतो. या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाला अनेकदा बाहेरून औषध – गोळ्या विकत आणाव्या लागतात.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , नांदेड ,बीड ,धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली यासह लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वत्र अलबेल कारभार आहे. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषधोपचार व कर्मचारी व डॉक्टरांची वागणूक यावरून अनेकदा बाचाबाची होते . तसेच त्याचे पर्यवसान भांडणात झाल्याचे पहावयास मिळते . रुग्णांचे वागणे प्रशासनाला कदाचित वाईट वाटणारे असेल परंतु त्याच रुग्णांना दिले जाणारे बनावट औषध जीवघेणे ठरत आहेत. अशा परिस्थितीत दोष रुग्णांचा की आर्थिक फायद्यासाठी बनावट औषधी विक्रेते करणाऱ्या कंपन्यांचा व प्रशासनाचा ? हा विचार कुठेतरी गांभीर्याने होणे गरजेचे आहे. मराठवाड्यात बोगस व बनावट औषधींच्या पुरवठ्यावरून पुन्हा एकदा रुग्णालयांची तसेच औषधांची खातरजमा करून त्यात दोषींविरुद्ध कडक शिक्षेची अंमलबजावणी व तरतूद आवश्यक आहे.
नांदेडच्या डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर आलेल्या रुग्णांना देण्यासाठी इंजेक्शनच उपलब्ध नसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जीव मुठीत घेऊन उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला बाहेरच्या खाजगी मेडिकलमधून इंजेक्शन विकत आणावे लागत आहे. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. असाच एक प्रकार निवडणूक प्रचारा दरम्यान घडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये असताना दुपारी तीन वाजता एका ४० वर्षीय महिलेला सभेसाठी जाताना रस्त्यावरील कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर त्या महिलेने नांदेडच्या श्यामनगर येथील महिला रुग्णालयात धाव घेतली. त्या ठिकाणी कुत्रा चावल्यानंतर दिले जाणारे इंजेक्शन उपलब्ध नाही, असे रूग्णाला सांगितले . त्यांना शिवाजी पुतळा येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले.
त्या ठिकाणी गेल्यावर त्या महिलेला सांगण्यात आले की, या जखमेवर लागणारे तीन पैकी केवळ दोनच इंजेक्शन येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात जा. सदरील महिला विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गेल्यानंतर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, तुम्हाला द्यायचे असलेले इंजेक्शन आमच्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध नाही. तुम्ही ते बाहेरच्या खाजगी मेडिकलमधून विकत आणा. ते इंजेक्शन रुग्णाला विकत आणावे लागले. त्यासाठी रुग्णाला ४६०० रुपयांचा खर्च आला. हा प्रकार आजही सुरुच आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज श्वान दंशाचे किमान २५-३० रूग्ण येतात. एकंदरीत पाहिले तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात असलेल्या शासकीय रुग्णालयात होत असलेल्या औषधींच्या पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बनावट औषधी असो की श्वानदंश असो, एखाद्याचा जीव गेल्यावर आरोग्य यंत्रणा जागी होणार आहे की काय ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
औषध गोळ्या तसेच उपचाराच्या बाबतीतही सर्वत्र अलबेल आहे. मराठवाड्यातील शासकीय रुग्णालये तसेच उपचार रामभरोसेच आहे , असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे ज्याप्रमाणे भ्रष्टाचारी , बेशरम लोकांना आवडते त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयात बनावट गोळ्या व औषधांचा पुरवठा करून त्या माध्यमातून आर्थिक कमाई करून घेणाऱ्या कंपन्या व त्याचे चालक उथळ माथ्याने फिरत आहेत. अशा भ्रष्टाचारी व जीवघेण्या कंपनी चालकांविरुद्ध कठोर शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे.
….डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com