नांदेड| गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पात्र व इच्छूक गोशांळाचे अर्ज मागविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, नायगाव, भोकर, कंधार, देगलूर या सहा तालुक्यामधून पात्र व इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
सर्वसाधारण अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
सदर संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. भारत पशुधन प्रणालीवर गोशाळा मालकाची व गोशाळेत असलेल्या पशुधनाची नोंद असणे बंधनकारक आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तपासणी अहवालात नमुद पशुधनाच्या नोंदीनुसारच अनुदान देय राहील. या संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखा परिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा. संस्थेकडे चारा, वैरण उत्पादनासासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा 30 वर्षे नोंदणीकृत भाडेपट्यावरची किमान 5 एकर जमीन असावी. संस्थेने या योजनेअंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी 10 टक्के एवढे खेळते भागभांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे. संस्थेस गोसेवा, गोपालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील. संबंधित संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. संस्थेवर कार्यरत कर्मचारी, मजूर यांचे वेतन इ. चा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी संस्था आर्थिकदृष्टया सक्षम असावी. या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल त्याच बाबीसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार नाही. ज्या संस्थेकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वत:च्या उत्पनाचे साधन आहे अशा संस्थाना प्राधान्य देण्यात येइल. प्रशासकीय विभागाची पुर्वपरवानगी घेऊन केवळ मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देय राहील. प्रशासकीय विभागाची पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुलभूत सुविधा निर्माण केल्यास अशा बाबीसाठी या योजनेत अनुदान मंजूर करण्यात येणार नाही.
निवड करण्यात आलेल्या गोशाळेस त्यांच्याकडे असलेल्या पशुधन संख्या विचारात घेवून दोन टप्यामध्ये अनुदान देय राहील. 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळेना 15 लक्ष रुपये अनुदान देय राहील. प्रथम हप्ता 9 लक्ष व दुसरा हप्ता 6 लक्ष रुपये याप्रमाणे राहील. 101 ते 200 पशुधन संख्या असलेल्या गोशाळेला 20 लक्ष रुपयापर्यत अनुदान देय राहील. प्रथम हप्ता 12 लक्ष व दुसरा हप्ता 8 लक्ष रुपये आहे. 200 पेक्षा जास्त पशुधन असलेल्या गोशाळांना 25 लाख रुपये अनुदान देय असून प्रथम हप्ता 15 लक्ष व दुसरा हप्ता 10 लक्ष रुपये राहील. अर्जाचा नमुना तसेच नियम व अटी याबाबतच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे पात्र व इच्छूकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
जिल्हा रेशीम कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
नांदेड जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड हे नवीन जागेवर स्थलांतरीत झाले असून या कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे. संबंधितानी या कार्यालयाशी संपर्क साधताना नवीन पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी एन.बी.बावगे यांनी केले आहे. जिल्हा रेशीम कार्यालयाचा पत्ता- जिल्हा रेशीम कार्यालय, रामाकृष्णा इमारत , दुसरा मजला, एम एफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर, हिंगोली रोड नांदेड-431602 तसेच कार्यालयाचा ई-मेल dso3nanded@gmail.com आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असेही कळविले आहे.