किनवट | परमेश्वर पेशवे….मराठवाडा सीमेवरील आदिवासी डोंगरी तालुक्यातील शेवटचं टोक असलेल्या सक्रूनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या पथकाने भेट देवून गुणवत्तेची पडताळणी केली. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करून रजिस्टर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. दुर्गम भागातील वाडी-तांड्यावरील बालके चुटूचुटू उत्तरे देऊ लागल्याने व शालेय कामकाज पाहून संबंधित पथकाने समाधान व्यक्त केले.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण मिळते की नाही याची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान दि.१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राबविण्याचे ठरविले असून याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, पीएम पोषण शक्ती निर्माण योजना अधिक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने, संजय राठोड, समग्र शिक्षा अभियानचे आरटीई प्रवेश प्रमुख डी.टी. सिरसाठ , उत्तम कानिंदे, केंद्र प्रमुख प्रमोद कांबळे , केंद्रिय मुख्याध्यापक संजय कांबळे आदींनी सक्रूनाईक तांडा जि.प.शाळेला नुकतीच भेट दिली.
यावेळी पथकाने शालेय पोषण आहार रजिस्टर, भाताची चव, अध्ययन निष्पत्ती, दप्तराचे ओझे कमी करणे, पाठ्यपुस्तकातील माझी नोंद, विद्यार्थी उपस्थिती, विदयार्थ्यांचे आधार, विनादप्तर एक दिवस शाळा, स्वयंपाकगृह, वर्गखोल्यांची स्थिती, स्वच्छतागृहे, परसबाग आदी घटकांची सुक्ष्म पाहणी करून काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या. त्याचबरोबर दिलेल्या सुचनांनुसार नियोजन करून कार्यवाही करा, रजिस्टर अद्ययावत ठेवा आदी महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. यानंतर या पथकाने खंबाळा येथील जि.प. केंद्रिय प्राथमिक शाळेची तपासणी केली. ही मोहिम जिल्हयात दि.१ ऑगस्ट ते दि.३१ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे.
चौकट :
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता यांनी वर्गात विदयार्थ्यांच्या समवेत खुल्या मनाने विदयार्थ्यांशी प्रश्नावलीच्या माध्यमातून हितगुज केल्याने विदयार्थी त्यांच्याशी पूर्णपणे समरस झाल्याचे दिसून येत होते. त्यांनी परसबाग , अंगणवाडी पाहिली व कुपनलिकेचं सांडपाणी जिथं मुरतं तिथे वृक्षारोपण केले. जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात एएमएस प्रणाली , वेध प्रशिक्षण अंमलबजावणीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा मुख्यालया पासून 200 किमी अंतरावर असलेल्या अतिदूर्गम तांड्यावर भेट देऊन विद्यार्थी गुणवत्तेची पाळेमुळे खोलवर रुजविण्याचा चंग बांधल्याचंच त्यांनी आपल्या भेटीतून दाखवून दिलं आहे.