नांदेड| कर्मचाऱ्या प्रति अत्यंत उदासीन असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान (Renuka Devi Sansthan) माहूर गड जि.नांदेड येथील कर्मचाऱ्यांनी सीटू संलग्न मजदूर युनियनच्या स्थानिक शाखेचे पहिले अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ जानेवारी रोजी माहूर मध्ये घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीतील हा निर्णय आहे. या बैठकीस सीटूच्या राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, किसान सभेचे नेते कॉ. किशोर पवार, जमसंच्या जिल्हा अध्यक्षा कॉ.लता गायकवाड आणि सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस एकूण ३० कर्मचारी उपस्थित होते.


साधारणतः सन २०१९ मध्ये सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वात माहूर गडावरील ५६ कर्मचाऱ्यांनी सीटू कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारत युनियनची स्थापना केली होती. स्थानिक युनिटचे अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव आणि सचिव कॉ.अरुण घोडेकर यांनी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम पाहिले आहे. परंतु संस्थानचे अध्यक्ष,सचिव, उपाध्यक्ष व कोष्याध्यक्ष यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने व दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संस्थान प्रति अविश्वास निर्माण झाला आहे.

मागील दहा ते पंधरा – वीस वर्षांपासून संस्थानमध्ये नोकरी करणारे कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कायद्याने सर्वांना कायम करणे व किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा करणे बंधनकारक आहे. येथील कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करणे , वेतनवाढ देणे, किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देणे आदी मूलभूत हक्काच्या मागण्या अजून पूर्ण झाल्या नाहीत.तेथील कर्मचाऱ्यांनी श्री रेणुका मातेच्या पहिल्या पायरीजवळ दोन वेळा आमरण आणि साखळी उपोषणे देखील केली आहेत.तत्कालीन संस्थांनचे सचिव श्री अभिनव गोयल(भा.प्र.से.) यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे पहिले उपोषण मोठ्या आशावादाने थांबविण्यात आले होते.

२०२२ मध्ये दुसरे साखळी उपोषण तब्बल ८४ दिवस गडाच्या पायथ्याशी पहिल्या पायरीजवळ केले परंतु विश्ववस्तानी रडीचा डाव खेळत कुणालाही उपोषणाची दखल घेऊ दिली नाही. सर्वच हतबल झाल्या सारखे वागले आणि संस्थान जिंकले व कामगार हारले असाच मागील इतिहास आहे. सीटू कामगार संघटनेच्या झेंड्याखाली देशातील सर्वात मोठे देवस्थान तिरुपती बालाजी पासून ते नाशिकच्या सप्तश्रुंगी मातेच्या संस्थानापर्यंत युनियन अस्तित्वात आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना किमान २० हजार रुपये ते ६० हजार रुपयापर्यंत दरमहा पगार आहे. परंतु रेणुका देवी संस्थान माहूर गड येथे १० हजार ते १५ हजार दरमहा पगार आहे आणि जाणीवपूर्वक येथील कामगारांना अद्याप कायम केले गेले नाही, ही शोकांतिका आहे.

सध्यस्थीतीत येथे ६७ कर्मचारी कार्यरत असून नव्या जोमाने संघटना सक्रिय करुण एकीच्या बळाने पुन्हा संघर्ष करणार आहेत. फेब्रुवारीच्या १८ तारखेला पहिले वहिले शाखा अधिवेशन माहूर शहरात घेण्यात येणार असून विश्वस्तांनी काही अडकाठी आणलीच तर परशुरामाच्या आश्रयाने तेथेच गडावर अधिवेशन पार पाडण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. उदासीन असलेल्या विश्वस्तांना सुबद्धी येवो आणि इतर देवस्थानातील कर्मचाऱ्या प्रमाणे माहूर येथील कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासना प्रमाणे सेवेत समावून घेऊन किमान वेतन मिळावे यासाठी ठराव पारित करण्यात येणार आहेत.
सदरील अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून हे अधिवेशन खुपच महत्वपूर्ण ठरणारे आहे कारण या अधिवेशनास इतर संस्थांनातील युनियन चालवीणारे पुढारी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. अशी माहिती सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कळविली आहे.