नांदेड| भाषेवरती प्रभुत्व आणि या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड तुमच्यामध्ये असेल तर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्ही क्षेत्रामध्ये नवोदित पत्रकार होऊ इच्छिणार्या युवक आणि युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. असे प्रतिपादन झी 24 तासच्या प्रसिध्द वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर यांनी केले.


महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता – माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेड आयोजित दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी संपादीत केलेले ‘भारतीय पुलिस और मीडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.30 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आव्हाने या विषयावर खानविलकर या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून झी 24 तासच्या प्रसिध्द निवेदिका अनुपमा खानवीलकर, झी 24 तासचे सिनीयर प्रोड्यूसर बागेश्री कानडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यीक देविदास फुलारी, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएम संगणकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष कोटगिरे, दै. लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी श्रीनिवास भोसले, तसेच महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी या मान्यवरांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना अनुपमा खानविलकर म्हणाल्या की, मागील वीस वर्षाकडे वळून पाहतांना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्हीमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना भाषेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. आता मोठ्या प्रमाणात खासगी वृत्तवाहिण्याचे चॅनल उपलब्ध आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये करीअर करण्याची संधी उपलब्ध आहे.

या क्षेत्रात काम करत असतांना प्रशिक्षण, शिक्षण, भाषेचे ज्ञान, काम करण्याची आवड आणि कोणत्याही परिस्थितीत कठोर परिश्रम करण्याची तयारी आवश्यक असते तरच यश मिळते असेही त्या म्हणाल्या. तर प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यीक देविदास फुलारी यांनी पत्रकारितेबद्दल बोलतांना पत्रकार हा संवेदनशिल मनाचा असायला हवा. सहज भाषा समजेल अशा भाषेत वृत्तलेखन करायला हवे. आता राजकारणाची भाषा, सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे ही बाब चिंताग्रस्त असून ही स्थिती पत्रकार सुधारू शकतात असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रामाणिकपणाचे अनेक उदाहरणे येथे देऊन समाजाची होत असलेली घसरण याबद्दल सडेतोड मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच झी 24 तासच्या सिनीयर प्रोड्यूसर बागेश्री कानडे यांनी टि.व्ही. चॅनल मधील काम करत असतांना आवश्यक असलेल्या कौशल्याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी अनुभवलेल्या 26/11 ची बातमी कवर करतांनाचा प्रसंग सांगून स्वतःमध्ये वेगळे गट्स निर्माण करून त्या दृष्टीने काम करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे यांनी टेलिव्हीजन, व्हीटीआर, एमसीआर या अभ्यासक्रमातील माहिती सांगितली. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करण्याच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आयोजक डॉ.गणेश जोशी यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाबद्दल माहिती दिली. या महाविद्यालयातून जिल्हा माहिती अधिकारी, तस्सम दर्जाचे अधिकारी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमात अनेक विद्यार्थी काम करत असल्याबद्दल माहिती देत महाविद्यालयाचा उंचावत गेलेला आलेख त्यांनी सांगितला. यावेळी अनेक पत्रकारांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून सन्मान केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.गणेश जोशी, प्रा.डॉ.प्रविणकुमार सेलुकर, प्रा. राज गायकवाड, दिक्षा कांबळे यांनी परिश्रम घेतले. अत्यंत सुरेख असे प्रसिध्द सुत्रसंचालन प्रा. ऋषिकेश कोंडेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.भगवान सुर्यवंशी यांनी मानले.