नांदेड। रविवारी सकाळपासूनच नांदेड शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याची कल्पना नसल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या असून अनपेक्षितपणे मोफत छत्र्या मिळाल्याचे पाहून भिजणाऱ्या महिलांनी समाधान व्यक्त केले.
पावसात सर्वजण आराम करत असताना दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेचा वसा सुरू ठेवत संतोष भारती यांच्यासोबत बसस्थानक गाठले. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नांदेड बस स्थानकावर एसटीतून उतरलेल्या महिला प्रवाशांची तारांबळ उडत होती. सोबत असलेल्या लहान मुलांना भिजण्यापासून वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न महिला करत होत्या. स्वतः जवळचे सामान घेऊन पावसात चालणे त्यांना अवघड होत होते. अशा परिस्थितीत दिलीप ठाकूर हे सर्वांना छत्री देत होते.
अनोळखी व्यक्तीकडून छत्री घेण्यास काही भगिनी संकोच करीत होत्या. परंतु दिलीप ठाकूर यांनी त्यांना एका भावाकडून ही भेट असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी छत्र्या घेतल्या. ध्यानीमनी नसताना अचानक छत्री मिळाल्यामुळे महिला भगिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले. गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेसाठी बाहेर गावाहुन आलेल्या शिवभक्तांना देखील दिलीप ठाकूर यांनी छत्र्या दिल्या होत्या. रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महा आघाडीच्या नेत्याविरुद्ध पावसात आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना देखील दिलीप ठाकूर यांनी महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते छत्र्याचे वाटप केले.
भाजपा महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने सतत पाचव्या वर्षी कृपाछत्र हा उपक्रम सुरू आहे. जितके वर्ष तितक्या छत्र्या वाटपाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. आतापर्यंत ५९८ छत्र्या वाटप करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नाव न छापण्याच्या अटीवर एका दात्याने १०० छत्र्यासाठी देणगी दिलीप ठाकूर यांना दिलेली आहे.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ५०,चंद्रकांत गंजेवार याच्या तर्फे ४८ तर हॉटेल मिडलँड गोकुळनगर नांदेड व स्नेहलता जायसवाल हैदराबाद यांच्यातर्फे प्रत्येकी ३२ छत्र्या मिळाल्या आहेत.
प्रत्येकी १६ छत्र्या देणाऱ्या मध्ये प्रमिला भालके, डॉ. गोविंद भाकरे,एक राम भक्त,अशोक पडगीलवार, रुहिका मुत्तेपवार, सुरेश पळशीकर,आनंद साताळे, ला. शिवाजीराव पाटील,मोहित व रेणुका सोनी, निर्मला द्वारकादास अग्रवाल,अबीरा पवार,वंदना शेळके परभणी,श्रीमती प्रतिमा चेरेकर हैदराबाद,किशनराव रामपल्ली,सुरेश लोट, सविता अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा, कामाजी सरोदे, संतोष भारती, राजेशसिंह ठाकूर,महंत कैलास महाराज वैष्णव यांचा समावेश आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी १४२७ छत्र्यांसाठी दात्यांची आवश्यकता आहे.
सफाई कामगार, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृत्तपत्र विक्रेते, रस्त्यावरील बेघर यांना छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत.छपाईच्या शुल्कासह किमान १६ छत्र्यासाठी रू.२५०० देणगी स्वीकारण्यात येत आहे . देणगी देणाऱ्यांची नावे छत्र्यांवर रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे वाटप त्याच देणगीदारांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत पन्नास हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.तरी दानशूर नागरिकांनी कृपा छत्र उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.