नांदेड| बीपी मंडल आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 (चार) प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आढळून आलेला नसून केवळ इसवी सन 1967 पूर्वी आणि निजामकालीन दस्तऐवजांमध्ये त्यांचे सामाजिक नाव कुणबी, कुणबी मराठा ,मराठा कुणबी होते. या आधारावरून त्यांना देण्यात आलेले व दिले जाणारे ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे याकरिता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पांडुरंग अनंतवार हे दिनांक २१ जुलैपासून हादगाव तालुक्यातील कवाना येथे आमरण उपोषणाला बसत आहेत. आमरण उपोषणादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीला राज्य सरकार स्वतः जबाबदार असेल असा इशारा त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा सपाटा सुरू केला आहे . वास्तविक हा प्रकार मूळ ओ बी सी वर अन्याय करणारा असल्याने तातडीने हा प्रकार बंद करावा . कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र रद्द करावे या मुख्य मागणीसाठी आता कवाना येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय अनंतवार यांनी एल्गार पुकारला आहे .
मंडल आयोगाकडून झालेल्या सर्वेक्षणात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या समाजातील नागरिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आढळून आलेले नाहीत. परंतु केवळ बहुसंख्यच्या बळावर आणि सुरू असलेल्या आरेरावीच्या जोरावर राज्य सरकार केवळ आपले सरकार टिकवण्याच्या उद्देशामुळे ओबीसी वर अन्याय करत आहे. ओबीसी समाजाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर हा आघात आहे .
ओबिसितून आरक्षण दिले तर मूळ ओबीसी समाज हा पुन्हा एकदा मागास होईल आणि सामाजिक विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात वाढेल. यासाठी असंविधानिकरित्या देण्यात आलेले कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र तातडीने रद्द करावेत आणि भविष्यात अशी प्रमाणपत्र देण्यास बंदी घालावी या मागणीसाठी आज पासून उपोषण सुरू करण्यात येत आहे . आपली मागणी मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशाराही दत्तात्रेय अनंतवार यांनी दिला आहे.