नांदेड| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटीच्या वतीने १० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.
सीटू आणि जमसंने वर्षभर लक्षवेधी आंदोलने करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर करून घेतलेले अनुदान अजून दीड हजार लोकांना मिळाले नाही. ही बाब गंभीर असून वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष देण्यास तयार नाहीत. लेखाशीर्ष चालू करून पैसे वर्ग करणे सहज आणि सोपे काम असताना देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे. तसेच माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे गावाखारी खाजगी किंवा वयक्तिक जमीन नसल्याने तेथे मागील ५० वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. यासाठी सीटू कामगार संघटनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत डझनभरा पेक्षा जास्त वेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून मागणी धारकांना प्लॉट्स आणि घरकुल बांधकामासाठी ५ लक्ष रुपयाची मागणी जिल्हाधिकारी आणि शासनाकडे केली आहे.
विशेष म्हणजे वझरा हे गांव पेसा क्षेत्रात येत असून ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ठराव शासनास दिला आहे. आणि पेसा ग्रामपंचायतचा ठराव विना विलंब मंजूर करून अंमलबजावणी करणे कायदा आहे परंतु अद्याप कारवाई झाली नाही. तसेच शेणी ता.अर्धापूर येथील सालगडी असलेल्या सौ. सुनीता आणि संजय हातागळे यांच्या १८ वर्षीय विद्यार्थी असलेल्या मुलाचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करून सीडीआर तपासून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पीडित आई वडिलांचे उपोषण आहे. त्यांच्या मागण्या सोडवाव्यत. पुयनी येथील महानंदा लोंढे यांच्या १७ वर्षीय मुलीचे एक महिन्यापूर्वी अपहरण झाल्याची एफआयआर नोंद रेल्वे पोलीस स्थानकात आहे. परंतु अद्याप शोध लागत नाही त्या अपहृत मुलीचा शोध घेण्यात यावा.या प्रमुख मागण्यासाह इतरही प्रलंबीत मागण्या अपूर्ण आहेत. त्या सर्व मागण्या सोडविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका आणि शहर कमिटीने दि.१० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. शहरातील मिल्लत नगर येथे नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात ह्या साठी वेगळे निवेदन देण्यात आले आहे. बजरंग कॉलनी येथे विंधन विहीर (हात पंप) मंजूर करावेत.
जो पर्यंत मागण्या सुटणार नाहीत तो पर्यंत बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय माकप तालुका कमिटीने घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.सुंदरबाई वाहुळकर, कॉ.गंगाधर खुणे, कॉ.गजानन गायकवाड, कॉ. मंगेश वटेवाड, कॉ. सूरज सरोदे, कॉ.पिराजी गायकवाड,आदिजण करणार आहेत.यावेळी मयत ऋतुराज हातागळे चे आई वडील व अपहृत ऋतुजा ची आई आमरण उपोषणास बसल्या आहेत. वरिष्ठ अधिकऱ्यांनी लक्ष घातले नाहीतर प्रलंबीत मागण्या इंडिया आघाडीच्या खासदार आणि आमदारांच्या निदर्शनास आणून देत त्यांची मदत देखील घेणार असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.