नांदेड। येथील राज कॉर्नर भागातील मंत्री नगर, अनिकेत नगर तसेच संकेत नगर भागातील अनेक घरातील नळांना मागील काही दिवसांपासून हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक वेळा नळाच्या पाण्यात जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या भागात सोमवार दि. २२ जुलै रोजी सकाळी जंतूयुक्त पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नागरिक व महिलांनी पालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला. प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी व केव्हा असा प्रश्नही उपस्थित करून एक दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून काबरा नगर येथील पाण्याच्या टाकीवरून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा तक्रारी वारंवार होत असतानाही पालिका प्रशासनाकडून पाहिजे तशी दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या भावना दुखावून संताप वाढला आहे. सोमवारी येथील परिसरात अनेक नागरिकांच्या घरी जंतूयुक्त पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. शहरात सुरू असलेल्या विविध कामांमुळे खोदकाम होऊन मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये लिकेज निर्माण झाल्याने होणाऱ्या दुषित व जंतूयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
पालिका प्रशासन याची गांभीर्याने दखल आता तरी घेईल का? असा प्रश्न परिसरातील डॉ.संतोष आडे यांच्यासह रहीवाशी नागरिकांनी केला आहे.