नांदेड| कौशल्य शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी स्कील्स ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत़ लेंड अ हॅन्ड इंडिया ( Lend a hand India) या संस्थेच्या वतीने भारतभर फिरती परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या परिक्रमेचे आगमन झाले असून जिल्ह्यातील १० शाळांना ही परिक्रमा भेट देणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेत या परिक्रमेचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आणि प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, आयोजन सहयोगी विजय मेश्राम, समन्वयक क्रांतीदीप कांबळे, मीनाक्षी अतकुलवार, अजय बॉम्बेकर, प्रशांत सोनावले व तुषार कुचेकर यांची उपस्थिती होती यावेळी संबंधित संस्थेच्यावतीने या उपक्रमाचे सादरीकरण आणि प्रात्यक्षिक करण्यात आले प्रात्यक्षिकानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज दाखवून शाळांना रवाना करण्यात आला.
एका मोठ्या वाहनामध्ये कौशल्य विकासाशी संबंधित सर्व साहित्य मांडण्यात आले आहे. ही फिरती प्रयोगशाळा नांदेड जिल्ह्यातील निवडक शाळांना भेटी देणार आहे. यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळांचा समावेश आहे. अलीकडे या संस्थेने २५ राज्यातील जवळपास १० हजार शाळांमध्ये भेटी देऊन या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला आहे. कौशल्य विकासासंदर्भात मुलांमध्ये जनजागृती करणे,या कार्यक्रमात मुलींचा सक्रिय सहभाग मिळवणे, नव रोजगाराच्या संधीची उपलब्धता करणे आदींचा समावेश आहे.
व्यवसाय शिक्षणासंदर्भात इलेक्ट्रो मेकॅनिकल, बेसिक इंजीनियरिंग, एनर्जी आणि एन्व्हायरमेंट, हेल्थ, फूड प्रोसेसिंग टेक्निक्स, गार्डनिंग, नर्सरी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आदींबाबत डिस्प्ले करण्यात आलेला आहे.या प्रयोगशाळेतील साहित्य वापरून विद्यार्थी कृती करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होतो. हे वाहन ( साहित्य असलेली मोठी बस ) एका शाळेत २ दिवस थांबणार असून यादरम्यान पहिल्या दिवशी शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कृती करून घेण्यात येणार आहेत.
हा कार्यक्रम २८ जुलैपासून अमलात येत असून दिनांक १८ व १९ जुलै रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मुलींची कन्या वजीराबाद शाळा, दिनांक २२ व २३ जुलै रोजी जिल्हा परिषद हायस्कूल शाळा विष्णुपुरी, दिनांक २४ व २५ जुलै रोजी पीएमसी केंद्रीय विद्यालय रेल्वे डिव्हिजन नांदेड, दिनांक २६ व २९ जुलै रोजी दशमेश ज्योत शाळा गाडेगाव, दिनांक ३० व ३१ जुलै रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव ,दिनांक १ व २ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मुगट, दिनांक ५ व ६ ऑगस्ट रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उमरी, दिनांक ७ व ८ ऑगस्ट रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धर्माबाद, दिनांक ९ व १० ऑगस्ट कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली आणि दिनांक १३ व १४ ऑगस्ट रोजी जनता विद्यालय नायगाव येथे असणार आहे. या कार्यक्रमास संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, समग्र शिक्षाचे समन्वयक आणि जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे येथील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कौशल्याधारित अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे विकसन करणे आणि रोजगार संधीच्या उपलब्धता होण्याच्या दृष्टीने उपक्रम महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा- मीनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.