बिलोली, गोविंद मुंडकर| बिलोली नगरपरिषद निवडणूक 2025 या वर्षी अत्यंत अटीतटीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकीय वातावरण तापलेले असताना अर्ध्या तासापूर्वीच दोन गटांमध्ये झालेल्या मोठ्या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारी मागे घेण्याच्या मुद्द्यावरून दोन वेगवेगळ्या गटांमध्ये तीव्र वाद आणि जोरदार बोलाचाली झाली. यामुळे उपस्थित नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक उफाळून आलेली ही धुसफूस प्रशासनासाठीही डोकेदुखी ठरली आहे.



वादाचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही, मात्र उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बिलोलीतील या राजकीय घडामोडींमुळे नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे आणि आगामी दिवसांत आणखी अनपेक्षित घटनांची शक्यता वर्तवली जात आहे.





