किनवट, परमेश्वर पेशवे| मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे एकुण 7 मस्टर पंचायत समिती किनवट कार्यालयात पुढील कार्यवाही करणेकरिता दिल्यास लाचखोर ऑपरेटर आरोपी अविनाश विश्वनाथ भुरेवार यास 3,500/- रुपयाच्या लाच स्वीकारताना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कार्यवाही केली. या कार्यवाहीनंतर किनवट भागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांनी मौजे शिरपुर, ता. किनवट, जि. नांदेड येथील ग्रामपंचायत हद्दीतील मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे एकुण 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केले. सदर मस्टरवर पुढील कार्यवाही करणेकरिता आरोपी अविनाश विश्वनाथ भुरेवार, वय – 32 वर्षे, ऑपरेटर (कंत्राटी) मनरेगा, पंचायत समिती, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक मस्टरचे 500/- रूपये याप्रमाणे एकुण 3500/- रूपयांची मागणी मागणी केली. सदरची रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाली. तक्रारदार यांना सदरची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी दिनांक 16/08/2024 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली.
मिळालेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपी अविनाश भुरेवार यांनी तक्रारदार यांचे 7 मस्टरचे पुढील कारवाई करणे करिता प्रत्येकी 500/- रूपये याप्रमाणे 3500/- रूपयाची पंचासमक्ष लाचेची मागणी केली. त्यावरून करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी अविनाश विश्वनाथ भुरेवार यांनी तक्रारदार यांचेकडून पंचायत समिती कार्यालय, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड येथे पंचासमक्ष लाचेची रक्कम 3500/- रुपये स्विकारतांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले आहे.
सदर कार्यवाहीत आरोपी लोकसेवकास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन किनवट, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि सापळा कार्यवाही संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र मो.क्र. 9545531234, पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड मो.क्र. 9870145915 यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी श्री गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांनी त्यांचे सापळा कारवाई पथक अँटी करप्शन ब्युरो, नांदेड टीमने केली आहे.
या कार्यवाही नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा. दुरध्वनी 02462-२५३५१२, टोल फ्रि क्रं. १०६४ हा क्रमांक देण्यात आला आहे.