नांदेड| अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून प्रस्थापित धर्मसत्तेच्या विरोधात बंड पुकारले. आंबेडकरवाद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. समाजाची पुनर्रचना ही अण्णाभाऊंच्या साहित्याची अपेक्षा होती. राजसत्ता हाती घेतल्याशिवाय दलितांची प्रगती होणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले होते. ते समाजातील विविध प्रकारच्या शोषण सत्तांच्याही विरोधात होते, असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी विचारवंत बाबुराव कोकरे यांनी केले.


ते भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या (बीपीएसएस) वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. शहरातील शिवाजी नगरच्या हाॅटेल विसावा पॅलेस काॅन्फरन्स हाॅल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, बीपीएसएसचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप काठोडे, राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, सुप्रसिध्द उद्योजक बालाजी इबितदार, प्रा. डॉ. श्रीमंत राऊत, सतिशचंद्र शिंदे, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.


भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने दरमहा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प ज्येष्ठ व्याख्याते बाबुराव कोकरे यांनी गुंफले. अण्णाभाऊंच्या साहित्यातील आंबेडकरवाद या विषयावर त्यांनी मांडणी केली. अध्यक्षीय भाषणात प्रज्ञाधर ढवळे म्हणाले की, अण्णाभाऊ म्हणजे न्यायाचे दाहक सौंदर्य होते. त्यांनी आयुष्यभर न्याय हक्कासाठी लढाई लढली. मानवी मुल्यांवर आधारित असणारी समाजरचना निर्माण व्हावी ही अपेक्षा व्यक्त करणारा आंबेडकरवाद मांडला.


जग बदल घालून घाव ही आंबेडकरी प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. अण्णाभाऊ साठे हे एका ऐतिहासिक संघर्षाचे नाव आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीमंत राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन सतिशचंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीपीएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



