तुळशी विवाह निमित्ताने तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ? यासंबंधीची शास्त्रीय माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत तुळसी विवाह साजरा करण्याविषयी उपयुक्त सूत्र या लेखात देत आहोत.
1. तिथी – हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.
2. पूजन – श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.
3. वैशिष्ट्ये – तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. विष्णु आणि लक्ष्मी या दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी-विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येत असतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळावा, यासाठी तुळशी-विवाह हा मुहूर्त कालातच करावा.
4. तुलसी दर्शनाचे महत्त्व – ‘प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असायलाच हवी’, असा संकेत आहे. ‘सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुलसीदर्शन करावे’, असे सांगितले आहे. या तुलसीदर्शनाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.
तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ – तुलसीस्तोत्र, श्लोक 15
अर्थ : हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.
5. तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये – पापनाशक : ‘तुलशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात.
पवित्रता : तुलसीचे बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते. या संदर्भात स्कन्दपुराणात (वैष्णवखण्ड, अध्याय 8, श्लोक 13 मध्ये) म्हटले आहे,
तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिङ्कराः ॥
अर्थ : ज्या घरी तुलसीचे वन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.
सर्व देवतांचा वास असणे : ‘तुलशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात’, असे सांगितले आहे.
श्रीविष्णूला परमप्रिय असणे : तुलसी वृंदावनात रहाते. ती श्रीविष्णूला परमप्रिय आहे. तुलसीदलाविना श्रीविष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते. पद्मपुराणात म्हटले आहे की, सुवर्ण, रत्ने आणि मोती यांची फुले श्रीविष्णूला वाहिली, तरी त्यांना तुलसीदलाच्या 16 व्या कलेचीही सर येणार नाही. तुलसीपत्र ठेवल्यावाचून किंवा तुलसीदलाने प्रोक्षण केल्यावाचून श्रीविष्णु नैवेद्य ग्रहण करत नाहीत. कार्तिक मासात (महिन्यात) तुलसीदलाने केलेल्या विष्णुपूजेचे माहात्म्य विशेष आहे. श्रीविष्णु, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा घवघवीत हार घालतात. – संदर्भ : ‘भारतीय संस्कृतीकोश’, खंड 4, पान क्र. 155
6. तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा !
देवांचे जलंधर दैत्याशी युद्ध चालू होते. त्या जलंधराची वृंदा नावाची पत्नी पतीव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवांकडून जलंधर दैत्याचा वध होत नव्हता. श्रीविष्णूने जलंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. त्याच वेळी श्रीविष्णूने वृंदेच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला, ‘वृंदा, तू तुळस होऊन सर्वांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रतिवर्षी कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल.’ भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात.
7. देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ?
तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्त्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्णतत्त्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते. देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचणे, सात्त्विक होणे, हे साध्य होते.
8. प्रश्न : तुळशीविवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर काय करावे ?
उत्तर : तुळशीविवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर आपल्याला जशी जमेल, तशी भावपूर्ण पूजा करावी. तेही जमत नसेल, तर ‘श्री तुलसीदेव्यै नमः’ असा नामजप करत तुळशीची पूजा करावी. पूजा झाल्यावर रामरक्षेतील पुढील ओळी म्हणाव्यात.
‘रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥’
त्यानंतर बृहद्स्तोत्ररत्नाकर या ग्रंथामधील सरस्वतीस्तोत्राच्या आरंभीच्या पुढील ओळी म्हणाव्यात.
‘या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥’
हे श्लोक म्हटल्यावर ‘सुमुहुर्त सावधान’ असे म्हणून तुळशीवर अक्षता वहाव्यात.
संदर्भ : सनातन संस्थेचे ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’ आणि ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था, संपर्क- 9284027180