नांदेड, गोविंद मुंडकर| श्री गणेश यांचे आगमन उत्साहवर्धक आणि आनंददायक असते. सर्व जाती धर्मातील लोक या उत्साहात सहभागी होतानाचे चित्र एकात्मतेचे पुरस्कार करणाऱ्या गावात दिसून येते. नांदेड जिल्ह्यातील विविध गावात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश ही विद्येची देवता. आराधनेत प्रथम वंदन करावयाची देवता. याचबरोबर विघ्नविनाशक म्हणून गणेशाची आराधना केली जाते.
आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या अनेक धार्मिक पंडितात श्री गणेशाच्या आराधनेच्या विविध बाबी जशा महत्त्वपूर्ण ठरल्या, तशा लोक चळवळीत लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला मिळवून दिलेले सार्वजनिक रूप आजही समाजातील विविध घटकातील लोक पुरस्कार करताना दिसून येतात. या उत्साहात नांदेडकर सहभागी होण्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांना विचलित केले.
विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेता अनेक राजकारणी विवंचनेत असल्याचे चित्र दिसून येते. राज्यसभेची ज्यांना लॉटरी लागली आणि ज्यांनी राज्यसभेची सीट मिळवून घेतली असे श्री अशोक चव्हाण आणि श्री अजित गोपछडे वगळता सर्वच राजकारणांना निवडणुकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहेच. माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांना स्वतःच्या कन्येला राजकारणात उतरून सक्रिय करून उत्तरदायित्व देण्याची तीव्र अभिलाषा आहे.
तर माजी खासदार तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांना आपली आपली सून डॉ. मीनल खतगावकर यांना राजकारणात सक्रिय केल्यानंतर राज्यातील महत्त्वपूर्ण पदावर विराजमान करण्याची असलेली तीव्र मनीषा. अशा सर्व विचलित आणि विवंचनेत असलेल्या लोकांना श्रद्धा आणि आस्थेच्या बळावर पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल असे दिसते.