स्वतःसाठीच तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी ही जगता आलं पाहिजे…
आपलंही आयुष्य देश सेवेसाठी परमेश्वराकडे मागता आलं पाहिजे…
आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून आपल्या देशासाठी आहे आणि या देहाचा वापर सत्कार्यासाठी लागावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन गोवा मुक्ती संग्रामात धाडसाने झोकून देऊन गोवा मुक्तीसाठी झटलेले स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना त्यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक उपेक्षित स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण व्हावे हा या लेखणाचा शुद्ध हेतू…..
भारत स्वतंत्र झाला मात्र गोवा हा पोर्तुगीज यांच्या ताब्यात होता. तेथील हिंदू वरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक ठिकाणी हत्याकांड,जबरदस्ती धर्मांतर या बाबीमुळे अनेकांच्या मनात असंतोष निर्माण केलेले होते . समता, बंधुता आणि न्याय भूमिका अंगी कारणारे तसेच सर्वांसाठी स्वातंत्र्य याचा लाभ मिळावा अशी भूमिका घेणारे,संवेदनशील बसवंतराव मुंडकर. अशा अवस्थेत कसे गप्प बसणार ? अशा काळात बिलोली येथे माध्यमिक शिक्षण घेणारे बसवंतराव मुंडकर यांनी गोवा मुक्ती संग्रामासाठी आपल्या सहकार्यांना या मुक्ती लढ्यामध्ये हिरीरीने भाग घेऊन देशासाठी लढण्याची प्रेरणा दिली. स्वतः पुढाकार घेऊन बिलोली शहर बंद करून चळवळीत सहभाग नोंदवला.या आंदोलनात त्यांच्या मित्रा सह अनेक आंदोलक सहभागी झाले होते. या आंदोलनाचा त्यांनी स्वतः नेतृत्व केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्याचे समकालीन ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्यान यातून सर्वश्रुत झाले आहेच.
देशभक्तीसाठी वय तसं गृहीतच धरलं जात नाही. माध्यमिक शिक्षण घेणारे बसवंतराव मुंडकर यांनी ज्येष्ठ आणि समवयस्क मित्रासह इयत्ता चौथीच्या विद्यार्थी मित्रांना या आंदोलनात सहभागी केले. सहभागी झालेले आंदोलक शरीरापेक्षा मनाने किती बलदंड होते. याची प्रचिती येते. बसवंतराव मुंडकर हे मजबूत शरीराचे आणि त्यांची धाडसी वृत्ती किती प्रबळ होती हे यावेळी दिसून आली. काहींच्या अंगामध्ये मूलभूत कला होती,कोणी सुंदर भाषण करून समोरच्यांना देशभक्तीसाठी प्रवृत्त करायचे तर काहीच्या अंगी देश सेवेसाठी प्रोत्साहन देण्याची वेगळीच धमक होती. सन 1945 ते 46 या काळामध्ये आपल्या देशामध्ये महामारी म्हणजेच प्लेचा रोग सुरू झाला होता तो रोग असा होता की शरीरावर गाठ आली की रोगी लगेच मरायचे.. आपण कोरोना पाहिलोत पण कोरोना पेक्षाही भयंकर असे या रोगाचं प्रादुर्भाव होता.
हा रोग एकदा झाला म्हणजे तो संपलाच असं लोक म्हणायचे? एवढे काय तर एक एके दिवशी दहा पंधरा प्रेतं एकाच सरणावर जाळून यायचे किंवा एकाच खड्ड्यामध्ये पुरून यायचे..एकाला नेलं की दुसरा तयार असायचा अशी काळीज पिळवटून टाकणारी दृश्य पाहिल्यानंतर माणसं राहतील की या जगात का साऱ्या जगाचा विध्वंस होईल असं वाटायचं.. लोक भीतीपोटी आप आपली घरदार सोडून जंगलात,शेतात राहू लागली.असे अनेक कुटुंब जिथे सहारा भेटेल तिथं जीव वाचवण्यासाठी जात होते.अख्खे गावची गावे सगळे काळजीत होती. अशाच आणीबाणीच्या काळामध्ये बसवंतराव मुंडकर यांचा परिवार एक सामाजिक सलोख्याच्या भावनेतून काही परिवारांना मदत केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून नव्हे तर उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून कळाले. हयात असताना त्यांनी कधीही आपल्या स्वतःच्या कामाची स्तुती केली नाही. समाजासाठी झटणारा हा क्रांतिकारक विचाराचा व्यक्ती आपली टिमकी वाजवत बसलेला नव्हता. यामुळे शासन आणि प्रशासन म्हणावे तसे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. जो दिखता है, वही बिकता है अशी अवस्था समाजाची,शासन आणि प्रशासनाची असल्यामुळे खऱ्या समाजसेवक आणि देशभक्त यांना म्हणावा तसा न्याय मिळत नाही. हे तेवढेच खरे.
विविध चळवळी आणि सामाजिक कार्यात भाग घेऊन सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आपल्या कामाविषयी दंभ चढू दिला नाही. नव्हे तर आपल्या कार्याची माहिती प्रगट करण्याचा मोह ठेवला नाही. त्यांचे जीवा – भावाचे मित्र विठ्ठलराव. त्यांचे छोटे बंधू समाजातील कृतज्ञ आणि प्रशासनातील कर्तव्यदक्ष निवृत्ती सहकार अधिकारी वैजनाथराव मेघनाळे यांनी आपल्या लेखन कौशल्याने स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव यांचे जीवनपट मांडल्यामुळे त्यांचे खेळाचे, सामाजिक कार्याचे पैलू वर्तमानपत्रातून जनसामान्यापर्यंत पोहोचले. कृतज्ञता पित्याची आणि, बाबा तुमच्यासाठी…! या अंतर्गत विविध उपक्रमात बिलोली तालुक्यातील इतिहास आणि मराठी विषयाचे गाढे अभ्यासक,ज्येष्ठ नागरिक तथा लघुळ संस्थांचे प्रमुख शामराव इनामदार यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांच्या गोवा मुक्ती संग्रामातील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील विविध आठवणींना ( संदर्भासह ) उजाळा दिला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आठवणी व्यक्त केल्या मात्र त्या लिपीबद्द आणि चित्रित झाल्या नाहीत. यामुळे त्यांचे जीवन नव्या पिढीला म्हणावे तसे माहित झालेले नव्हते. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कृतज्ञता पित्याची आणि बाबा तुमच्यासाठी …! या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे दिसून येते.
स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आणि गोवा मुक्तिसंग्रामाच्या चळवळीतील योगदान, यामुळे स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला देशसेवा, स्वातंत्र्य याची जाणीव असलेले प्रशासनातले उच्च पदस्थ अधिकारी आवर्जून उपस्थित राहत असतानाचे चित्र आता दिसून येते आहे. बसवंतराव देशसेवा अत्यंत निष्ठेने केले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेळेवर बी बियाणे खत पुरवठा होत नाही.अशा शेतकऱ्यांची त्यांना काळजी वाटायची पण त्यांनी निष्ठेने आणि तत्परतेने शेतकऱ्यांचे अनेक कामे करताना दिसून येते. बसवंतरावाचा खणखणीत आवाज आणि स्पष्टवक्तेपणा हे कुठे लपून राहायचा नाही.त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा त्यांनी कधी गय केली नाही.त्याचा मूळ स्पष्ट आणि सरळ मार्गे स्वभाव कोणाची भीड न ठेवता सरळ सरळ बोलणारे असा हा त्यांचा स्वभाव.मित्रांशी असो किंवा गाववाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून,सहकार क्षेत्रात झोकुन काम करणारे,अधिकारी वर्गामध्ये मैत्रीपूर्ण पण प्रसंगी कठोर वागणारे.. त्या काळातील पुढारी यांच्यावर स्पष्टपणे ताशेरे ओढणारे.. वेळ पडला तर उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणारे, अशा उत्तम खेळ व खेळाडूं विषयी खिलाडू वृत्ती बाळगणारे, सच्चे देशभक्त,सामाजिक,राजकीय, क्रीडाक्षेत्रात, कृषी क्षेत्रात,आयुष्य लावणाऱ्या बसवंतराव मुंडकर नव्या पिढीला प्रेरणास्थान नक्कीच आहेत यात काही शंका नाही.
लेखक – बालाजी पेटेकर खतगावकर, अहिल्यारत्न’ कॅनल रोड,माणिक नगर, नायगाव जि.नांदेड