नांदेड | बोली एक संस्कृती उभी करत असते, एखादी बोली लुप्त झाली तर ज्ञानाचं मोठं संचित नष्ट होतं. त्यामुळे बोलीभाषेच्या संदर्भात काम करत असताना आपण एक संपूर्ण संस्कृती नव्याने स्थापित करत आहोत या भूमिकेतून शब्द संकलनापासून संशोधनापर्यंत प्रत्येक टप्प्यापर्यंत बोलीभाषा प्रेमींना कार्य करावे लागेल अशी अपेक्षा समीक्षक तथा भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम (सोलापूर) यांनी व्यक्त केली.
मराठवाडी बोली बोलू कौतुके’व्हाट्सअप ग्रुपचा यावर्षीचा सालमेळा हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा (ता.वसमत) येथे रविवारी (दि.18) नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भरविण्यात आला. या मेळ्यास मार्गदर्शन करताना डॉ.कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले हे होते. विशेष अतिथी म्हणून नांदेडचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रसिध्द नाटककार श्री.राजकुमार तांगडे, संस्थेचे सहसचिव शामराव पांडे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, गटविकास अधिकारी तोटावाड, डॉ. दिलीप चव्हाण, कवयित्री सारिका उबाळे आदींची उपस्थिती होती. कवी केशव कटिंग याच्या पुढाकाराने मराठवाडा बोली भाषा विकसित करण्यासाठी व्हाट्स अप च्या माध्यमातून संवर्धन व संकलन केले जात आहे.
त्याचा साल मेळा (वार्षिक ) रविवारी ग्रामीण पध्दतीने पार पडला यावेळी बोलताना डॉ. कदम पुढे म्हणाले, मानवी मस्तिष्कात भाषिक विकासाचा एक भाग स्वतंत्रपणे काम करत असतो. भाषेचा विचार केला असता आपल्याला हे समजून येईल की सर्वसाधारण माणसांमधून आलेली भाषा बोलीभाषा आहे. आर्य आणि अनार्याच्या काळात संस्कृत भाषा लादली गेली. त्यामुळे अनार्याचे जे प्रमुख होते ते आर्य संस्कृतीमध्ये खलनायक ठरले. याचप्रमाणे भाषेच्या बाबतीतही झाले. शेती संस्कृतीमधून उतरलेली भाषा खरी लोकभाषा आहे. आता बोलीभाषेच्या संदर्भात जे काही शब्द संकलन झाले आहे तेवढ्यावर थांबता येणार नाही. त्याला संशोधनाची जोड देऊन प्रत्येक भाषेच्या मुळापर्यंत जायला हवे. संशोधनाच्या नंतरच खर्या अर्थाने बोलीभाषा पुन्हा समाजात स्थापित करता येईल.
दररोजच्या आयुष्यात अनेक शब्द आपण मुळापर्यंत जाऊन अभ्यासले तर आपल्याला त्या शब्दांचे संदर्भ कळू लागतात. संस्कृतीची निर्माता ही स्त्री आहे त्यामुळे स्त्रीच्या माध्यमातूनच भाषा विकास आणि अन्य सांस्कृतिक विकास झाल्याचे आपल्याला दिसून येते. उंबरासारख्या झाडाचे महत्व यासाठी आहे की या झाडापासून पहिल्या नांगराचा फाळ बनवला गेला. याच पद्धतीने अनेक शब्दांंच्या मागे असलेली संस्कृती पूर्णपणे जाणून घ्यायला हवी.
आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ मातृभाषेत शिक्षण घेणारी मुले सर्वाधिक प्रमाणात यशस्वी झाली. याचा अर्थ मातृभाषेत मिळणारे शिक्षण हे सर्वात प्रबळ असल्याचे स्पष्ट होते. शब्दांच्या मागे केवळ संस्कृती नाही तर एक इतिहास दडलेला आहे. त्यासोबत पारतंत्र्यात सापडलेल्या समाज व्यवस्थेचे चित्र स्पष्टपणे दिसते, असेही त्यांनी सांगितले. खल्लाळ यांना मानपत्र व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
त्यांनी वसमतच्या कार्यकाळात केलेल्या महत्वपुर्ण कामांचा उल्लेख करत बोलीच्या शब्दकोषासाठी प्रत्येक टप्प्यावर लागणार्या मदतीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले. बाभूळगाव येथे गोपाळराव कदम यांंच्या शेतात 25 वर्षापासून काम करणारे 73 वर्षीय वामन गंगाधर वास्टर यांच्या राजा कदम यांचा सालगडी लखन मालक यांचा या कार्यक्रमात कपड्यांचा जोड, टॉवेल टोपी देवून विशेष सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात सालगडी लखन यांची बोली ग्रुपचे सदस्य माऊली देशमुख यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी बोली ग्रुपचे सदस्य सूर्यकांत बागल यांनी प्रास्ताविकातून समूहाच्या कामाचा आढावा घेतला. समूहाचे प्रमुख केशव खटींग यांनी बोली भाषेच्या संशोधन कार्याची माहिती मांडली. सुत्रसंचालन बबन गिनगीने यांनी केले.