शाळा कसली असती हे माहीत नाही….पेन वहीच्या तर आई वडिलांनाही कधी संबंध आला नाही… शिकलेल्या माणसाजवळ बसायचीही हिंमत (लायकी) नाही. असं स्वतःला समजणारी माणसे नंदीवाले समाजाची तेलगू भाषिक आहेत. आणि महादेवावर श्रध्दा ठेवणारी आहेत… परंतु इतर समाजाची लोक कधी रागावतील या भितीपोटी ती महादेवाच्या मंदिरातही कधी दिसली नाहीत. तर मग शाळेत तरी कसे दिसतील… चोरी चपाटी, गुंडगिरी अशा गोष्टींपासून कोसो दूर राहणाऱ्या वस्तीतील दोन बायका रस्त्यात पाणी पिऊन रिकाम्या बिसलेरी बाॅटल वेचत असताना त्यांची ही मुलगी दुर्गंधीयुक्त नालीजवळ गडबडा लोळत असतांना पाहिलो आणि थबकलो..
शाळेत जाते का?
आम्हाला कशाची शाळा असते…?
शाळेत आली तर ही पोलिस होऊ शकते.
पण आम्हाला कोण शिकवणार शाळा?
मी आहे की…
कुठे रहाता?
बालाजी मंदिराजवळ ….
अजून कुणी लेकरं हाईत का शाळेत न जाणारी?
हाईत की ८-९
तुमची शाळा कुठं हाय?
त्या जुन्या सरकारी दवाखान्याजवळ..
तेवढ्या लांब कसं येतील हे?
आटो बांधून देतो की.. जमतंय मंग… कवा येऊ पालाकडे गडी माणसं कवा भेटतील…
चार वाजता या तवा राहतात… वेगळ्याच मराठी ट्युनिंग मध्ये संवाद झाला.
दुसऱ्या दिवशी दुपारनंतर चार वाजता गेलो.. दहा पंधरा पालामध्ये एक दोन गडी दिसले… काय आलंय की लचांड वाटले की काय कोण जाणे संवाद नीट करायला तयार नाहीत… दोन बायका दिसल्या बाकीचे गडी कधी येणार आहेत विचारलो.. उद्या या पाच वाजता.. दुसऱ्या दिवशी गेलो तरी भेट होईना…
नाविलाजाणे सकाळी सात वाजता मित्राला घेऊन गेलो… कुठे गेलेत इतक्या लवकर कोणीच गडी नाहीत ? उत्तरातून काहींच बोध होईना.. फक्त आत्ताच गेलेत एवढेच समजले. मास्तर आमची लेकर शाळेत टाकू नका म्हणालेत आमच्या माणसानं.. का बरं ? नकोच म्हणलेत..
आमची लेकरं दुसऱ्या लेकरा बरोबर बसत नाहीत..शाळा शिकले तर पोलीसांचा सायब बी होतील की? बरं जमतंय मंग पण आमच्या लेकराला अलग बसवितो म्हणलो तर साळत पाठवितावं.. मगं अलगच बसवितो म्हणून वचन देऊन तीन चार विद्यार्थ्यांचा प्रवेश फार्म भरला.. बाकींच्याचे दुसऱ्या दिवशी…
अशा प्रकारे शाळेत दाखल झालेली ही मुलं एका महिन्यातच १ ते ३० पर्यंत वाचालेत, लिहालेत. A पासून Z पर्यंत वाचन लिखाण करत आहेत… 1 ते 6 अंक आणि अ पासून छ पर्यंत वाचन आणि लिखाणापर्यंत आली आहेत तसेच बडबड गीते गुणगुणत आहेत व मैदानी खेळ खेळत आहेत.. या कामासाठी अनेकांचे सहकार्य लाभत आहे आपणास काहीतरी करता आले याचे मानसिक समाधान मात्र निश्चित आहे.
लेखक…. राजीव तिडके, सहशिक्षक जि.प.हा.लोहा