किनवट, परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत नव्याने बांधकाम केलेल्या सुमारे १२० इमारतींचे आज ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन व नविन इमारती बांधकामांचे भुमीपुजन आदिवासी विकास मंत्री ना. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा वसतिगृहांच्या इमारतींचे भूमिपूजन व उद्घाटन झाले आहे.
त्यामध्ये किनवट तालुक्यातील पाटोदा, बोधडी, तलाईगुडा, सारखणी, या आदिवासी आश्रम शाळांचा समावेश आहे. या अर्थाने महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते पार पडलेला हा ऑनलाइन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरला. नंदुरबार येथे आज दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता नंदुरबार शहरातील शासकीय आदिवासी वसतिगृह आवारात हा सोहळा पार पडला. ऑनलाइन उद्घाटन व भूमिपूजन झालेल्या 120 पैकी 49 इमारती नंदुरबार जिल्ह्यातील असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित, नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्प अधिकारी अमेय नावंदर, धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, नासिक अधीक्षक अभियंता विजय पाटील, नाशिक येथील कार्यकारी अधीक्षक अभियंता नीरज चौरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी समाजातील गरिबी आणि मागासलेपण संपवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या दृष्टिकोनातूनच आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण सुविधांसाठी भरभरून योजना दिल्या अर्थसहाय्य देणे सुरू केले आहे. येत्या काही दिवसात आदिवासी शाळा आणि वसतिगृहांचे संपूर्ण डिजिटला-यझेशन केले जाईल. कोणत्या शिक्षकाने काय शिकवले विद्यार्थ्यांनी काय जेवण केले यासारख्या सर्व गोष्टींवर कॅमेरा नजर ठेवणार असून ती यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. शिक्षणासाठी ज्या ज्या सोयी लागतील त्या शंभर टक्के उपलब्ध करून देणार आहे. कारण आदिवासी मुलांचं शिक्षण दर्जेदार झालंच पाहिजे यावर माझा भर आहे. त्यासाठी आतापर्यंत दिले जाणारी 1500 ची रक्कम वाढवून 2200 केली.आदिवासी विद्यार्थ्यांना घरभाडे भत्ता लागू केला.
दिवसागणिक शिक्षण पद्धती बदलत असल्याने मुलांना शिकवणारे शिक्षक सुद्धा अपडेट झाले पाहिजे या हेतूने आश्रम शाळांमधून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची सुद्धा परीक्षा घेण्याची पद्धत आपण सुरू केली आहे. पाहिजे तितक्या शिक्षकांना पीएचडी करण्याची मुभा सुद्धा लागू करीत आहोत, अशी माहिती देऊन मंत्री नामदार डॉक्टर गावित पुढे म्हणाले, आश्रम शाळांमध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय केला. राज्यात २५० आदर्श आश्रमशाळा म्हणून विकसित करणार आहोत. 100 आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जात आहे.
पशुपालन कुक्कुटपालन शेती उत्पादन प्रक्रिया उद्योग यासाठी अर्थसहाय्य देऊन उद्योग करू पाहणाऱ्यांना आपण उभे करीत आहोत. शेवटी हा आदिवासी विकास विभाग तुम्हा सर्वांचा आहे. दुर्लक्षित घटक ताकदीने उभारा रहावा या हेतूने तुम्ही मागाल ते द्यायला आम्ही तयार आहोत, फक्त उचित तेवढे मागा; असेही नामदार डॉक्टर गावित म्हणाले.