नांदेड| भारतरत्न पुरस्कार चित्रपट कलावंताला देण्यात येणार असेल तर तो अमिताभ बच्चन यांच्याऐवजी सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत रजनीकांत यांना देण्याची मागणी नॅशनल भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी नुकतीच केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा सरस, दर्जेदार आणि लोकप्रिय अभिनेते रजनीकांत हे आहेत. जातीपेक्षा गुणवत्ता महत्वाची असून ती रजनीकांत यांच्याकडे आहे म्हणून त्यांनाच भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी भारताचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
रजनीकांत हे एका चित्रपटासाठी १४५ कोटी रुपये घेतात, हा रेकॉर्ड आजवर कुणीही तोडला नाही. अमिताभ बच्चन ४.६ कोटीच्या वर कधी गेले नाहीत परंतु केवळ जातीच्या आधारावर त्यांना सरकारी जाहिराती आणि व्यापक प्रसिद्धी देण्यात असल्याची गंभीर टिका इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी या निवेदनातून केली आहे.
सामाजिक क्रांती घडवून आणणारे म. जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी या निवेदनातून केली आहे.