नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी.
राज्य निवडणूक आयोगाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिले. उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासन परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी निर्गमीत केले आहे.