किनवट, परमेश्वर पेशवे। अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल तालुक्यातील इस्लापूर जिल्हा परिषद प्रभागातील व परिसरातील संस्थेमधील कर्मचारी ही संस्थेत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यास शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याची विदारक दृश्य इस्लापूर परिसरात पहावयास मिळत आहे.
गेल्या वीस वर्षापासून आदिवासी बहुल भागाचा फायदा घेऊन राजकीय पुढार्यांनी या भागांमध्ये शैक्षणिक संस्थांची बस्तान मांडली. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या राजकीय पुढार्यांनी लाखो रुपयाची कमाई केली असल्याचे बोलले जाते. त्यातच ही शैक्षणिक संस्था राजकीय पुढार्याच्या आशीर्वादाने चालत असल्याने या शैक्षणिक संस्थेतील मुख्याध्यापिका या संस्थाचालकाच्या जवळील नातेवाईक असल्याने त्या सतत शाळेमध्ये गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी नेहमी ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळतात.
त्यातच दिनांक१ जुलै रोजी या शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेत हजर नसताना सुद्धा त्यांची हजेरीपटावर सही असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. या सर्व बाबी किनवट येथील शिक्षण विभागाला माहित असून सुद्धा या बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्या जात असल्याची ओरड आता या परिसरातील जनतेमधून ऐकायला मिळत आहे. शिक्षण विभागाचे पाणी कुठे मुरते का असाही सवाल या निमित्ताने पुढे येतो.
त्यातच सदरील शाळेतील सहशिक्षक यांना चिखली येथील शाळेवर प्रतिनियुक्तीचे लेखी आदेश न देता तोंडी आदेशाने चिखली येथील शाळेवर पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून किनवट तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बने हे या बाबीकडे लक्ष देतील का व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळतील का याकडे आता या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे ? व सदरील शिक्षण संस्था ही कुठल्या राजकीय पुढाऱ्याची आहे व कोणाच्या आशीर्वादाने चालते याचा सुद्धा शोध घेणे आता शिक्षण विभागाला गरजेचे बनले आहे?
त्यातच जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष मिनल करणवाल या बाबीचा शोध घेतील का? व या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळतील का? असा सवाल शिक्षण प्रेमी मंडळीकडून ऐकायला मिळत आहे. आठवी ते दहावी इयत्ता पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था ही या डोंगराळ भागात येत असल्याने बहुतांशी विद्यार्थ्यांचा फायदा होईल असे या भागातील जनतेला वाटले होते .
पण झाले उलटेच मस्तवाल राजकीय पुढार्यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या या शैक्षणिक संस्थेचा कार्यभार हा नांदेडहून चालत असल्याने या संस्थेची काही दांडीबहादर कर्मचारी सुद्धा वाऱ्यावर राहू लागली त्यामुळे या संस्थेचावाली कोण म्हणण्याची पाळी आता या भागातील जनतेवर आली आहे. संबंधित शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा करावा व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशा स्वरूपाची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.