नांदेड। किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.२३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांना किसान जनआंदोलन, भारतच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मोर्चाची सुरूवात कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे चौकापासून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.दुपारी एक वाजता कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून मोर्चाची सुरवात करण्यात आली.
यावेळी किसान जनआंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल,मुख्य समन्वयक कॉ.गंगाधर गायकवाड, बालाजी आबादार पाटील,मारोती सवंडकर, अजित पाटील, भारत सूर्यवंशी,सुनील अनंतवार,गोविंद पाटील,सूरज कौऊटकर आदींनी अण्णा भाऊ साठेना पुष्पहार घालून अभिवादन करून शेतकरी – कामगार एकजुटीच्या गगनभेदी घोषणा देत मोर्चाची सुरवात केली.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व जीवनमरणाच्या मागण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी सामील झाले होते. या मोर्चास पाठिंबा देत शकडो कामगारांनी देखील आपला सहभाग नोंदविला.
उपरोक्त मोर्चात खालील प्रमुख मागण्याचे निवेदन केंद्रीय कृषीमंत्री ना.शिवराजसिंग चव्हाण,राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आदींना जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देखील संपूर्ण मागण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात पीक संरक्षण कायदा करण्यात यावा , शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज देण्यात यावे.पिक कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष करावा तसेच किमान आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने कार्यान्वित करावेत व कापूस खरेदी करीता ते १ आक्टोबर २०२४ पुर्वी फेडरेशन सुरु करावेत. पंतप्रधान पिक विमा योजनेचा क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात देण्यात यावी.शेतकऱ्यांना झिरो बॅलन्स वर बँकेत बचत खाते काढण्याचा अधिकार देण्यात यावा.
शेतकऱ्यांचे बँकेतील बचत खाते होल्ड करु नये.ऊस लागवड व तोडणी प्रोग्राम ऑनलाइन करून उस कारखान्याची दादागिरी व एकाधिकारशाही संपवा. फळे-भाजीपाला बाजारातील एकसारख्या गुणवत्तेच्या मालाचा भाव फरक, वजन वजावट, कमीशन इ. रद्द करा आणि शेतमाल विक्री नंतर पैसे (पट्टी) त्याच दिवशी देण्याची कारवाई करा.पेस्टीसाइड (कीटकनाशके) व केमिकल मधील ५००% पर्यंतची नफाखोरी संपवा आणि शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपण्यांना शील ठोका.आदी शेतकरी हिताच्या मागण्यासह कामगारांच्या मागण्याचे वेगळे निवेदन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नांदेड तहसीलदार यांना देण्यात आले.
१ ते ३ सप्टेंबर रोजी नांदेड शहरात अतिवृष्टी होऊन नदीकाठावरील व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या सर्वांना सरसगट सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच सीटू कामगार संघटनेच्या कामगारांनी मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे गृह पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्या सर्वांच्या घरी जाऊन पाहणी करावी व पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारावेत तसेच तलाठी व वसुलीलिपिक हे पीडिताच्या घरी न जाता दलाला मार्फत व्हाट्सअपवर नावे मागवून बोगस पूरग्रस्तांची यादी तयार करीत आहेत. त्याचे सायबर शाखे मार्फत व्हाट्सअप चॅट तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात सचिन कासलीवाल, कॉ.विजय गाभने, कॉ. गंगाधर गायकवाड, बालाजी आबादर पाटील, कॉ.उज्वला पडलवार, मारोती सवंडकर ,अजित पाटील,दिलीप कंधारे आदींनी मनोगतपर मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सामील झाले होते.मोर्चा यशस्वी करण्यासाठी सूरज कौऊटकर, श्याम सरोदे, जयराज गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.