हिमायतनगर| तालुक्यातील राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याचे मंजूर काम होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. पावसाळ्यात या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी इतरत्र वळविला जात असल्याची ओरड होत असून, मग हा रस्ता गेला कुठे..? असा सवाल आता पावनमारी करांमधून उपस्थित केला जात आहे.
हिमायतनगर तालुक्यात पावनमारी या गावाला जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही पावनमारी करांची रस्त्याच्या बाबतीत मोठी उपेक्षा कायम होती. वेळोवेळी वर्तमान पत्रात या संदर्भाच्या बातम्या ही प्रकाशित झाल्या. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून १ कोटी ५० लक्ष रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. एका आघाडीच्या दैनिकांत निधी मंजूर झाला असल्याची बातमी ही प्रकाशित झाली होती.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावाला पक्का रस्ता बनवीला जाणार म्हणून गावकर्यांतही आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतू या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे बोलल्या जात आहे. हा मंजूर रस्ता इतरत्र वळविण्यात आला असल्याचे स्थानिक नागरिकांतून सांगितले जात असून आमचा मंजूर रस्ता गेला कुठे..? असा सवाल आता पावनमारीकर विचारात आहेत. आमचा गावासाठी मंजूर झालेला रस्ता आम्हाला द्यावा. अन्यथा आगामी विधान सभेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे पावनमारीकर सांगत आहेत.
रस्ता नसलेले पावनमारी गावची ग्राम पंचायत टेंभुर्णी असून, रेशन दुकान टेंभुर्णी, प्राथमिक उप आरोग्य केंद्र विरसणी, ग्राम पंचायत मतदान केंद्र टेंभुर्णी जिल्हा परिषद मतदान केंद्र टेंभुर्णी, तलाठी सज्जा खडकी, लोकसभा, विधान सभा मतदान केंद्र खडकी, जवळचे रेल्वे स्टेशन खडकी, पावसाळय़ात या गावत शाळेवर शिक्षक येवू शकत नाही, आरोग्य सेवा मिळत नाही, गर्भ ती महिला, जेष्ठ नागरिक याना खाटेवर, पाठीवर दवाखान्यात न्यावे लागते, अस हे नांदेड जिल्ह्यातील, महाराष्ट्र आणि देशातील आगळे वेगळे गाव आहे. पदाधिकारी, अधिकारी, डोळे असून, आंधळ्यांच आणि कान असून बहिऱ्याचं सोंग घेत आहेत. या गावाला रस्ता देण्याएवजी पावनमारीच्या नावावर आणि रस्त्याला नंबर नाही म्हणुन किरमगांवला शेतात शिवाराकडे जाणार्या 8 फुट रुंदीच्या रस्त्यावर काम करण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप सरपंच प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांनी केला आहे. तशी एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली असून, यामुळे पावनमारी रस्त्याचा निधी दुसरीकडे वळविला जात असल्याची एकच चर्चा हिमायतनगर तालुक्यात होते आहे.
या संदर्भांत पावनमारी गावचे सरपंच प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, गेल्या तिस वर्षांपासून आम्ही या अंतर्गत रस्त्याची मागणी करीत आहोत. लोक प्रतिनिधी, शासन स्तरावर प्रयत्न सातत्याने करीत राहीलो, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटला होता. गेल्या मार्च मध्ये या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी १ कोटी ५० लक्ष रूपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. याच मंजूर रस्त्याचे काम इतरत्र वळविण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. माझ्या गावाला निधी मंजूर झाला तिथे काम करावे. अशी माझी मागणी असून, आम्ही अन्याय सहन करणार नाही. आमचा निधी कोणी पळवून नेत असेल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही. त्यासाठी आमदार खासदारांनी आमच्या पावनमारी गावासाठी रस्ता करून देऊन गावाला शहराशी जोडावे नाहीतर मंजूर निधीतील रस्ता दुसरीकडे झाला तर न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे टेंभुर्णी पावनमारी गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रल्हाद पाटील यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केली आहे.