नांदेड| नांदेड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी औद्योगिक क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर या दृष्टीने पुढचे पाऊल पडू शकते. या बाबीचा विचार करून मारतळा येथील प्रस्तावित असलेली एमआयडीसी स्थापन करा (Set up the proposed MIDC at Maratala) अशी आग्रही मागणी नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज्च्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आज एका शिष्टमंडळाने केली.


नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज्चे अध्यक्ष डी.पी.सावंत यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत उपरोक्त मागणी केली. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, दि.13 जानेवारी 2025 मध्ये उद्योग विभागाकडून एक पत्र काढले असून त्यामध्ये लोहा तालुक्यातील मारतळा, कुंभारगाव व कापसी या गावामधील कृषीसाठी अनुत्पादीक असलेली 100 हेक्टर जमिनीचे एमआयडीसीसाठी भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. एमआयडीसीच्या विस्ताराच्या दृष्टीने ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.

2008-2009 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान राज्यसभा खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरातील 582 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाची अधिकृत सूचना निघाली होती. परंतु ही कारवाई पूर्णत्वास जावू शकली नाही. यापुर्वी त्यांनीच शिफारस केल्याप्रमाणे जर मारतळा, कहाळा, कृष्णूर ते घुंगराळ्यापर्यंतच्या जमिनीचे अधिग्रहण केले तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येवू शकतात. तरी आपण या संदर्भात तात्काळ कारवाई करून एमआयडीसी मार्फत या जमिनीचे अधिग्रहण करावे अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली.

त्यासोबतच नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या जमिनीचे भूसंपादन करावे अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम मेडेवार, नारायणलाल कलंत्री, बाबुराव शक्करवार, नरेश गोयंका, एकनाथ मामडे, रवी कोटलवार, सुनिल मेडेवार, अभिजित गव्हाणे यांचा सहभाग होता. तर यावेळी नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर, हदगावचे आ.बाबुराव कदम कोहळीकर हेही उपस्थित होते.
