हदगाव, शेख चांदपाशा| हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये श्री. महादेव मठ संस्थान, हदगाव येथे नित्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी मठाचे मठाधिपती श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे तृतीय श्रावण मास तपोनुष्ठान आयोजित केले आहे.


अकराव्या शतकात श्री.बसवलिंग महास्वामीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला श्री. महादेव मठ परिसरातील सर्व भक्तमंडळी साठी श्रद्धेचे स्थान आहे. याच ठिकाणी बसवलिंग महास्वामी यांची संजीवन समाधी आहे. दोन वर्षांपूर्वी येथील मठाधिपती लिंगैक्य बसवलिंग शिवाचार्य महाराज शिवैक्य झाल्यानंतर येथील गादीवर श्री. ष. ब्र. 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक झाला. तेव्हापासून महादेव मठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये अकरा दिवसीय तपोअनुष्ठान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याचा प्रारंभ श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी 05 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून सांगता गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.


अनुष्ठान सोहळ्यात संपूर्ण अकरा दिवस सकाळी 5 ते 7 गुरुमाऊलींचा एकांतात जप, सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक व सामूहिक इष्टलिंग महापूजा, 10 ते 12 सिद्धांतशिखामणि तत्वअमृत ग्रंथाचे पारायण, दररोज दुपारी 2 वाजता शिवकथा, सायंकाळी 4 वाजता शिवपाठ, सायंकाळी सहा ते आठ एकांतात इष्ट लिंग महापूजा या नित्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

अनुष्ठानादरम्यान 8 ऑगस्ट पासून दररोज दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवकथाकार प्रेममुर्ती जगदीश आनंद महाराज शास्त्री आळंदीकर यांची सुश्राव्य शिवकथा आयोजित केली आहे. 13 ऑगस्ट रोजी शिवदिक्षेचा कार्यक्रम तसेच 14 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता श्री. ष.ब्र. 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, साखरखेर्डा यांचा लक्ष बिल्वारचन सोहळा आयोजित केला आहे.

या श्रावण मास तपोनुष्ठानासाठी श्री. ष.ब्र. 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा), श्री. ष.ब्र. 108 वेदांताचर्य दिगंबर शिवाचार्य महाराज (थोरला मठ वसमत), श्री. ष.ब्र. 108 सद्गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा) श्री. ष.ब्र. 108 सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज (आष्टी लक्ष्मणाची) प.पू. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज (श्री.क्षेत्र पिंपळगाव) महंत प.पू. श्री.गोपाळगीर महाराज (दत्त बर्डी संस्थान हदगाव), प.पू. श्री. योगीराज बापू (श्रीकृष्ण मंदिर हदगाव), प.पू. श्री गजानन महाराज केने बापू (आर्णीकर), ह. भ. प.श्री. सिताराम महाराज (रोडगे आष्टी) या गुरुवरयांची उपस्थिती लाभणार आहे.
अनुष्ठानादरम्यान शिवकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 13 ऑगस्ट रोजी शि.भ.प. पेलुरकर महाराज, 14 ऑगस्ट रोजी शि.भ.प. श्रीदेवी ताई कापशीकर तर 15 ऑगस्ट रोजी शि.भ. प. वेदमूर्ती राजेश्वर स्वामी जामगव्हाणकर यांचे प्रसादाचे कीर्तन होणार आहे. अनुष्ठानादरम्यान संपूर्ण अकरा दिवस महाप्रसादाचे आयोजन केले आहे. संपूर्ण सोहळ्याचा सर्व सदभक्तांनी लाभ घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे असे आवाहन मठाधिपती सद्गुरु श्री. शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.