नांदेड/बिलोली| आपले घर,दार सोडून प्रसंगी मुलांबाळांपासून दुर राहुन भारत मातेच्या रक्षणासाठी जिवाची पर्वा न करता सैन्य दलाच्या माध्यमातून देश सेवा करतात. देश सेवा करणारा सैनिक जेव्हा सेवा निवृत्त होऊन आपल्या स्वगृही येतो तेव्हा त्या सैनिकाच्या निवृत्तीनंतर होणाऱ्या कार्यक्रमामुळे तरुण पिढीला विविध माध्यमातून देश सेवा करण्याची प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंदराव मुंडकर यांनी केले.
ते दिनांक 11 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील बामणी येथील भव्य मैदानात पाच हजार लोकांच्या उपस्थितीत. येथील सतरा वर्षे सैन्य दलात देशसेवा करून सेवानिवृत्त सैनिक साईनाथ शंकरराव जक्कावाड हे गावी परतल्या निमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळ्या प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मुंडकर पुढे असेही म्हणाले की, देशसेवा आणि संस्कार या दोन्ही बाबी अशा कार्यक्रमातून विकसित होत आहेत. येथे प्रारंभी मातापित्यांचा सत्कार करण्यात आला. घरोघरी श्रावण बाळ तयार झाल्यास वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही.वृद्धाश्रम ही आमची संस्कार आणि संस्कृती नाही.
सतरा वर्षाची देशसेवा करून गावी परतलेल्या साईनाथ जक्कावाड यांचा देशभक्तीपर गीतांच्या तालांवर जक्कावाड यांची बिलोली ते त्याचे मुळ गाव असलेल्या बामणी (बु) पर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. तदनंतर बामणी बु येथे समस्त गावकरी मंडळींच्यावतीने सेवा निवृत्त सैनिक साईनाथ यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला. यावेळी सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव मुंडकर यांचे एकमेव भाषण झाले. याप्रसंगी अर्धापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे,माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, सपोनी ज्ञानेश्वर शिंदे, मारूती नंदे, अजय पाटील, सरपंच शारदाबाई पाटील, उपसरपंच हणमंतराव दरवाजे, सरपंच महेश हांडे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर , मित्र परिवार व गावकरी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संतोष शेट्टे यांनी केले.