हिमायतनगर,अनिल मादसवार| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीची कुलस्वामिनी नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता पूजेचे मानकरी यांच्या हस्ते व पुरोहित कांता गुरु वाळके व साईगुरु बडवे यांच्या मधुर वाणीत अभिषेक व अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी महाआरती करून प्रसादाचे वितरण झाले, आगामीं नऊ दिवस मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
नवरात्रोत्सवात नित्यनेमाने दररोज सकाळी आणि रात्री महाआरती केली जाणार आहे. दि.०३ गुरुवार ते दि.०९ बुधवार पर्यंत दररोज दुपारी ०१ ते ७ या वेळेत संगीतमय देवी भागवत कथा हभप एड नारायण महाराज सोनखेडकर यांच्या मधुर वाणीत होणार आहे. दररोज आरतीनंतर सायंकाळी कालिंका देवी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. देवी भागवत कथेचा समारोप शेवटच्या दिवशी आणि काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होईल.
दि.११ रोजी कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी ११ ते ०४ वाजेच्या दरम्यान महानवमी, होमहवन, महाआरती व पूर्णाहुती कार्यक्रम होणार आहे. दररोज सप्तसीती पाठाचे वाचन सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान पुरोहित कांतागुरु वाळके हे करतील. दि.१२ शनिवारी दुपारी ०४ वाजेच्या दरम्यान माता कालिंका देवी मंदिरापासून ढोल तश्याच्या गजरात भव्य अशी दसरा मिरवणूक काढून, परत कालिंका मंदिरात आल्यानंतर समारोप केला जाणार आहे. या नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमच लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन कमेटीचे अध्यक्ष – राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष – दिलीप पार्डीकर, सचिव – संजय मारवार, सहसचिव – गजानन तीप्पणवार, कोषाध्यक्ष – ज्ञानेश्वर पंदलवाड, शरद चायल व सर्व विश्वस्त मंडळींनी केलं आहे.