नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारत राष्ट्र समितीचे नेते बालाजी शेळके यांनी नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसन्मान यात्रेदरम्यान नांदेड दौर्यावर आल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी बालाजी शेळके यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन जून्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी त्यांना तात्काळ पक्ष प्रवेशासाठी विचारणा करून प्रवेश देण्यात आला. यावेळी पक्षाचे मराठवाडा प्रभारी आ.विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार,प्रा.गोविंद मेथे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,अजितदादा पवार व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापनेपासून पक्ष एकसंघ असतांना बालाजी शेळके पाटील या पक्षात कार्यरत होते.कृषी,सहकार व सामाजिक प्रश्नांची जाण आणि प्रत्येक क्षेत्रांचा गाढा अभ्यास असल्याने भारत सरकारच्या वस्त्रोद्योग महामंडळ,अन्न व प्रक्रिया उद्योग महामंडळ,राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलाइजर्स महामंडळ तसेच,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संचालकपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.त्याचबरोबर, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा संघटक,जिल्हा उपाध्यक्ष या पदांनाही त्यांनी न्याय देऊन सर्वच समाजघटकांना एकत्रित करुन पक्ष संघटनवाढीसाठी प्रयत्न केलेले होते व पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठीही ते ईच्छूक होते मात्र त्यावेळी त्यांची या पदावर वर्णी लागली नाही.
दरम्यानच्या काळात भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगनाचे तत्कालीन मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन थेट हैदराबाद येथे बोलावून चर्चा केली व त्यांच्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्याचाही शब्द दिला होता. त्यादृष्टीने त्यांनी आपले कार्य सुरू ठेवलेले असतांनाच नांदेड दौर्यावर आलेल्या ना.पवार यांनी थेट पक्षप्रवेशाचे निमंत्रण देऊन त्यांना पक्षात घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण कोणत्याही पदाच्या अपेक्षेने प्रवेश केलेला नसून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आगामी काळात दिलेली जबाबदारी निष्ठेने कार्यकर्ता म्हणून पार पाडू अशी ग्वाही बालाजी शेळके पाटील यांनी दिली. बालाजी शेळके पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करुन कौतुक केले आहे.त्यांच्या पक्षप्रवेशाने पक्षाची ताकद वाढली असून भविष्यात पक्षसंघटनवाढीला निश्चितच त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे.
भारत राष्ट्र समितीतून गळती सूरुच !
महत्वाची बाब म्हणजे,गत वर्षभरापूर्वी तेलंगनाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमधून भारत राष्ट्र समितीची मुहूर्तमेढ रोवली होती व अनेक दिग्गजांना आपल्या पक्षात घेतले होते. परंतू,त्यांच्या पक्षातील यशपाल भिंगे यांनी काॅग्रेसचा रस्ता धरला आहे.त्या पाठोपाठ काॅग्रेसकडे सुरेश गायकवाड यांनी ही आगामी विधानसभेसाठी देगलूर-बिलोलीतून उमेदवारीची मागणी केली आहे.तर,माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनीही आगामी विधानसभा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे स्पष्ट करुन भारत राष्ट्र समितीऐवजी महाराष्ट्र राष्ट्र समिती स्थापन केलेली आहे. त्यातच,बालाजी शेळके पाटील यांनीही भारत राष्ट्र समितीला सोडचिठ्ठी देउन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केल्याने मुख्यत्वे नांदेडमधून भारत राष्ट्र समितीतून गळती सुरुच असल्याचे यावरुन दिसून येते.