नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे दि .१८ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान संपन्न होणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या विद्यार्थी विकास मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये लोककला, नृत्य, नाट्य, वाङ्मय व ललित कला या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १८०० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.
‘ज्ञानतीर्थ’ या युवक महोत्सवासाठी शोभा यात्रेकरिता ‘मराठवाड्याची कला व संस्कृती’ हा विषय देण्यात आलेला असून, वादविवाद स्पर्धेसाठी ‘महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी वर्तमान कायदे पुरेसे सक्षम आहेत /नाहीत’ हा विषय दिला आहे. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी १) भारतीय संविधान: जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, २) वेदना जाणावयाला जागवू संवेदना, ३) असाध्य ते साध्य करिता सायास, ४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० :संधी व आव्हाने हे विषय देण्यात आले आहेत.
युवक महोत्सव म्हणजे कलावंतांना जन्माला घालणारी कलाभूमी त्या अनुषंगाने हा महोत्सव युवा विद्यार्थी कलावंतासाठी एक मोठी पर्वणीच असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा त्या दृष्टीने विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयांनी या महोत्सवातील शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले आहे.
सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे संपन्न होणाऱ्या या युवक महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका दि. २८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थी विकास विभागात सादर कराव्यात. उशिरा आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.