विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर इकडून तिकडे उड्या मारणार्या नेत्यांपाठोपाठ कार्यकर्तेही पक्ष बदलत आहेत. मराठवाड्यात हल्ली हा प्रकार जवळपास सर्वच जिल्ह्यात सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी महायुतीला पसंती दर्शविली आहे. तशीच परिस्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची दिसून येत आहे.
काहींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ केले तर काहींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याला पसंती दिली. पक्ष बदली करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार, उबाठा तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठवाड्यातील आजी-माजी नेते तसेच पदाधिकारी व कार्यकर्तेही सत्ताधारी पक्षाकडे वळत आहेत.मराठवाड्यात अनेक आजी-माजी पदाधिकारी महायुतीत प्रवेश करण्यात धन्यता मानत आहेत. यामुळे मात्र शरद पवार यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाला मात्र चांगलीच गळती लागली आहे
लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात जे चित्र होते आता पुन्हा तसेच पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात आमदारां पाठोपाठ खासदारही पक्ष बदलणार असल्याच्या चर्चांनी मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्याचा परिणाम मराठवाड्यात ग्रामीण भागात व शहरात दिसून येत आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांपासून खासदारांपर्यंत सगळ्यांनाच पक्ष बदलाचे डोहाळे लागले आहेत. राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने त्या पक्षात जाण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. स्वतःचे काम काढून घेण्यासाठी जो शक्तीशाली नेता आहे त्यांच्या पाठीशी राहण्याच्या उद्देशाने हे पक्ष बदलाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत.
कोणत्याही नेत्याचा सालदार म्हणून काम करायचे नाही, या भावनेतून या कोलांटउड्या सुरू आहेत, किंबहूना पक्ष बदलाचा सोहळाच म्हणावा या प्रमाणे मराठवाड्यात सत्ताधारी पक्षांत इनकमींग सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम करून भाजपाशी जवळीकता साधणाऱ्या अजित पवार यांची राजकीय भूमिका राज्याच्या राजकारणात लक्षवेधक ठरली. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मराठवाड्यात चांगले बळ मिळत आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतःचे पाय भक्कम करण्यासाठी मराठवाड्यात या कोलांटऊडया सुरू झाल्या आहेत. याचे एक कारण म्हणजे शरद पवार गटाचे खासदार भाजपाकडे वळविण्याची जबाबदारी दिल्लीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर सोडली आहे .
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाषणादरम्यान अजित पवार यांना तुम्ही देखील भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात असे बोलल्याने मराठवाड्यात त्यांच्या या वक्तव्यावर बरीच चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपला अधिक जवळचे वाटत आहेत की काय, अशी शंका येण्याइतपत मराठवाड्यात राजकारणात उलाढाली सुरू आहेत. शरद पवार गटातून बापलेकींना सोडून सगळ्यांनाच भाजपमध्ये आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. व याची जबाबदारी दिल्लीतील भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपसोबत अजित पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष मोठा राहील. या उद्देशाने मराठवाड्यातील अनेकांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी व भाजपची वाट धरली आहे. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये इनकमिंग बंद असल्याच्या चर्चेमुळे मराठवाड्यात अनेक जण अजित पवार यांच्या गटात जाण्यासाठी धडपड करत आहेत.
शरद पवारांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे, हे मराठवाड्यात आजी-माजी नेत्यांना लक्षात आल्याने ते देखील पक्ष बदलीसाठी मुंबईत नेत्यांच्या भेटीगाठी फिल्डिंग लावत आहेत . राज्यात शरद पवार यांना माणणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार व खासदार अजित पवार यांच्याकडे यायला तयार झाले आहेत. यामुळे मराठवाड्यात शरद पवार यांना मानणारे नेते व पदाधिकारी चलबिचल अवस्थेत आहेत. नंतर सगळ्यांचीच गर्दी होईल त्यापेक्षा अगोदर नंबर लावलेला बरा, या उद्देशातून या राजकीय उलाढाली दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जून २०२४ मध्ये फुट पडल्यापासून अनेक आमदार व खासदारांनी इकडे तिकडे जाण्याची तयारीही केली होती. सुरूवातीला लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या पक्षाला चांगले यश मिळाल्याने अजित पवार यांचे समर्थक लुडबुड करायला लागले होते. परंतू विधानसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाने चांगले यश मिळविले . त्या दिवसापासून अजित पवार यांच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील अनेकजण आमच्याकडे येण्यासाठी उत्सूक आहेत, असा दावा केला.
एकीकडे शरद पवार यांच्या पक्षाला मराठवाड्यात गळती लागली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचा दबदबा राहिला नसल्याने त्यांना देखील राजकारणात धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील मराठवाड्यात असणारे अनेक पदाधिकारी व जुने कार्यकर्तेही पक्षाला सोडून गेले. ‘जिसकी लाठी उसकी भैंस’, या म्हणीप्रमाणे सत्ताधार्यांकडे जाण्याचा ओघ वाढला आहे. आणखी काही दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपुर्वी या कोलांटउड्या चालूच राहणार आहेत.
मराठवाड्यात अनेकांना ग्रामपंचायतीपासून महापालिकेचे सदस्यत्व हवे आहे. त्यामुळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पक्ष बदलाचे हे वारे असेच वाहत राहणार आहेत. अनेक आजी-माजी नेते पक्ष बदलतील परंतू शेवटी जनतेला सत्ताधारी म्हणून तेच चेहरे लोकांना दिसणार आहेत. मराठवाड्यात ग्रामपंचायत , जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत भविष्यात शेवटी सत्ता महायुतीतील तीन पैकी एका पक्षाकडेच जाईल, अशी परिस्थिती हळूहळू निर्माण होत आहे. सर्वसामान्यांसाठी नेते मात्र पुर्वीचेच राहणार आहेत फक्त पक्ष मात्र बदललेला दिसून येईल. राज्याच्या राजकारणात भाजपाची चलती असल्याने त्यांच्याकडे व त्यांच्या मित्र पक्षांकडे हा ओघ काही काळापुरता का होईना चालूच राहणार आहे. मराठवाड्यात महायुतीमधील काही बंडखोर महायुतीमध्येच जात आहेत, फक्त पक्ष वेगळा निवडत आहेत. हे चित्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पहावयास मिळत आहे.
कोण कधी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नाही. परंतू काहीही असले तरी स्वतःची सोय पाहूनच राजकीय नेते उड्या मारत आहेत. त्यांच्या पाठोपाठ काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते ही सोयीनुसार पक्ष बदलत आहेत. शेवटी सत्तेला सलाम व उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत मराठवाड्यात असल्यामुळे हा राजकीय स्टंट पहावयास मिळत आहे. आणखी काही दिवस मराठवाड्यातील राजकारणात मोठ-मोठे धक्के बसणार आहेत.
लेखक…डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com