नांदेड/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील ३३ वर्षीय युवकांस हातोडीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या युवकांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हि घटना दि. १२ रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर दि. १३ रोजी त्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पवना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या आईच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. आरोपी हा मयताचा मित्रच असल्याचे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले असून, मित्राने मित्राचा खून..? केला असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील आशिष साईनाथ जाधव ३३ वर्ष या युवकाचा सरसम ते करंजी महामार्ग रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील सिमेंट पुलाच्या संरक्षण भिंतीच्या मधोमध गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर नंतर एकच खळबळ माजली. त्या जखमी युवकांस नांदेड येथे अधिक उपचारांसाठी नेण्यात आले होते. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताची आई सुंदरबाई साईनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज व फोन कॉलवरून चौकशी साठी मयताचा मित्र संशयित म्हणून पवना येथील प्रदिप विश्वनाथ तपासकर वय ३३ वर्ष यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यानआरोपीने गुन्ह्याची कबूली दिली असल्याने त्यास अटक केली गेली. या मर्डर केस मधील आरोपी सिद्ध झाला असला तरी आणखीन या गुन्ह्यांमध्ये कुणाचा सहभाग आहे का..? या दृष्टीने हिमायतनगर पोलीस शोध घेत असून, आरोपी प्रदीप तपासकर यास न्यायालयासमोर उभे केले असता पुढील चौकशीसाठी न्यायालयाने आरोपीस ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी सांगीतले.
एकूणच आरोपीची प्रकृती पाहता हा गुन्हा त्याच्या एकट्याने होऊ शकत नाही… त्याने हा खून कश्यासाठी केला याची माहिती देखील पुढे आली नाही. त्यामुळे मयातच खून करण्यासाठी त्या आरोपीच्या मदतीला आणखी कुणी आहे का..? याचा शोध पोलिसांनी घेऊन यातील अन्य आरोपीना अटक करून सत्य उजेडात उजेडात आणायाला हवे अशी चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.