श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शासनाने प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळूसाठा पुरविण्याचे नवीन धोरण राबविले आहे.त्यानुसार माहुर तालुक्यातील केरोळी येथील वाळूडेपो मधून घरकुल धारकांना दगड व मातीमिश्रित वाळू पुरविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील व सोशल मीडिया प्रमुख प्रशांत पुरी यांनी दि.२७ जून पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
विविध योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या माथी दगड व मातीमिश्रित वाळूसाठा मारल्या प्रकरणी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भाजप तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, माजी सभापती नामदेव कातले,वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड, शिवसेना नेत्या टीपकर यांनी भेट देऊन आपला पाठींबा घोषित केला.
सर्वच घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास दर्जेदार वाळूसाठा उपलब्ध करून द्या, वाळू डेपोतून फक्त तालुक्यातील गरजूंनाच वाळू द्या,चढ्या दराने जिल्ह्याबाहेर विकली जाणारी वाळू तातडीने थांबवा व वाळूडेपो चालकासह सर्वसांबंधितावर कारवाई करा या मागण्या घेऊन उपोषण कर्त्यानी उपोषण सुरू केले आहे. वाळू मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच आमरण उपोषण करावे लागत असल्याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.