नांदेड। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे चक्क पुरुष मंडळीच्या आधार कार्डाचा वापर करून जवळपास सव्वा तीन लाख रूपयांची रक्कम भावाच्या खात्यात जमा करून घेतले. यातून काही जणांची किरकोळ रक्कम देवून बोळवण केली. त्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटताच मनाठा येथील सुविधा केंद्र आणि झेरॉक्स सेंटर चालक फरार झाला आहे. या प्रकारामुळे हदगाव सह नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्या सीएससी चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


हदगाव तालुक्यातील मनाठा येथे बोगस आणि फसवणूक करणारा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मनाठा येथील ३० ते ४० पुरुषांचे गावात असलेल्या अनाधिकृत सीएससी केंद्र चालक तथा सचिन झेरॉक्स सेंटर या नावाने दुकान चालविणाऱ्या सचिन थोरात याने आधार कार्ड घेऊन लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरले आणि त्या अर्जाची मान्यता मिळविली. यामुळे ४ हजार ५०० रुपये प्रमाणे ३ लाख १९ हजार ५०० रूपये जमा झाले. ही गोष्ट हेरून त्या झेरॉक्स सेंटर चालकाने काहींना ५०० तर २०० रुपये देऊन त्यांची उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवले. यातील काही जणांना लाडक्या बहिण योजनेचे पैसे असल्याचे लक्षात येताच त्या झेरॉक्स सेंटरचालकास जाब विचारला असता सगळ्याचे पैसे घेऊन तो फरार झाला आहे. या बाबत अधिकृत यादी मात्र मिळू शकली नाही. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत दीड हजार रुपये प्रति महा मिळत आहेत.


काही लोकांना तुमच्या खात्यात रोजगार हमी योजना, विहीरीचे पैसे येतील असे सांगून तरी काही जणांच्या खात्यात जमा झालेली रक्कम उचलून घेतली आहे. या गंभीर बाबीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून लाडकी बहिण खात्याच्या प्रस्तवाला मंजुरी देतांना हे खात महिलांचं की पुरुषाचं हे का..? लक्षात येऊ नये, याबाबत आर्चय व्यक्त होत आहे. तर जिल्ह्यात बारकाईने तपास केला तर कित्येक गैर प्रकार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी तर ५०० रुपये घेऊन लहान १३ ते १४ वर्षाच्या मुलीचे सुध्दा वय वाढवून लाभ देण्यात आला आसल्याचे सुद्धा बोलले जात आहे. या बोगस कारनाम्यासाठी दुसऱ्यांची आय डी वापरण्यात आल्याचे पुढे येत आहे तर रोजगार हमी योजनेचे पैसे असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. परंतू हा प्रकार आम्हाला काहीच माहीत नसल्याचे ज्या तरुणांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले त्या तरूणांनी सांगितले आहे.
